राजा माने
आपला जन्म जसा आपली कर्तबगारी नसते अगदी तसेच आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही निसर्गाचा लकी ड्रॉच ठरवितो. हाच ड्रॉ आपल्याला जन्मा बरोबर फ्री जातही बहाल करतो. ती फ्रीममध्ये मिळालेली जात कुणाला फायद्याची तर कुणाच्या तोट्याची ! फायदा-तोटा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग. त्या हिशेबातच गरिबी किंवा श्रीमंतीचं गाठोडंही जन्मावेळीच डोक्यावर येतं.. तिथं नो अपील,नो आंदोलन,नो मोर्चा ! जसे असाल,जेथे असाल तेच कम्पलसरी स्वीकारणे.नो ऑप्शन ! त्याच कम्पलशनशी लढून हसत हसत जगायचं की रडत रडत,कुढत कुढत मरायचं, हा साधा,सोपा प्रश्न.. पण याच प्रश्नाची उकल करता करता अनेकांचे केस पांढरे होतात, अनेकांचं टक्कल चमकायला लागतं अनेकांचं आयुष्यही समारोपाकडे धाव घेवू लागतं.. या कालचक्रातील भाव-भावनांना आपल्या पेंसिलच्या प्रत्येक रेषेत घट्ट बांधण्याचे काम कला जगतातील पेन्सिल चित्रांचा जनक शशिकांत धोत्रे लिलया करतो आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या तालुक्यातील शिरापूर या छोट्याशा खेड्यात वडार समाजात जन्मलेला हा तरुण. श्रमदेवतेची पूजा बांधत आई-वाडीलांसह कुटुंबाचे पोट भरण्यासाठी दगड फोडत जगत असताना वडिलांनी त्याच्या हाती कौतुकाने बॉलपेन दिला.ज्याच्या हाती आपण पेन देतोय,त्याला कलाविश्व हाक देते आहे आणि हाच पेन एका पेन्सिल चित्रांच्या जनकाला जन्म देणार हे त्याच्या वडिलांच्या ध्यानी मनी नसावे. शशिकांतने मात्र त्याच पेनने चित्रं रेखाटण्याचा श्रीगणेशा केला आणि पाहता पाहता चित्रांची मालिका गुंफली गेली.काळ्या कागदावर विविध रंगी पेन्सिलचा वापर करुन त्याने अस्सल ग्रामीण संस्कृती चितारली. स्थळ,निवडलेली पात्रं आणि त्या पात्रांच्या मनात चाललेली घालमेल त्याने असंख्य बारकाव्यासह आपल्या प्रत्येक चित्रांत तंतोतंत उतरविली. त्याची चित्रं कलारसिकांशी अक्षरशः बोलू लागली !
शिरापुरच्या शशिकांतची पुण्या-मुंबईत वाहवा होवू लागली.आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि अनेक दिग्गज व्यक्तीच्या दिवाणखाण्याचे आकर्षण ठरु लागली. कला रसिक त्याच्या चित्रांना लाखोंची किंमत मोजू लागले .मग मात्र त्याने अधिक जोमाने पुढे जायचे ठरविले आणि देशभर आपल्या चित्रांचा " ट्रॅव्हल शो" करण्याचा निर्णय घेतला.मुंबईची जहांगीर आर्ट गॅलरी असो वा पुणे-कोल्हापूर असो त्याच्या चित्रांचा ट्रॅव्हल शो पाहण्यासाठी रसिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.या प्रवासातच त्याने नवी मुंबईत आपला स्टुडिओ थाटला.परवा त्याच्या स्टुडिओत त्याची भेट घेतली.दोन-तीन तास कसे गेले समजलेच नाही.सैराट पासून कोपर्डी पर्यंतच्या प्रत्येक विषयावर तो भरभरुन बोलला.त्याच्या प्रत्येक वाक्यात त्याचं अस्वस्थ मन डोकावत होतं. त्याच अस्वस्थ मनाला आपल्या नव्या चित्र मालिकेत तो व्यक्त करतो आहे.तीच थीम घेवून पॅरिसच्या " ऑपेरा गॅलरी" सोबत १२ चित्रांचे प्रदर्शन होणार आहेत.पॅरिस,दिल्ली आणि कोलकता येथे ही प्रदर्शनं होणार आहेत.त्या मालिकेतील दोन चित्रांवर तो शेवटचा हात फिरवीत होता.दोन्ही चित्रांत स्त्री पात्रं आहेत.दोन्ही चित्र महिला विश्वातील बंधानांचे भाव व्यक्त करतात.त्यातील एकचित्रातील स्त्री सतार वाजवीत आहे.तिच्या सतारीच्या तारेला एक पक्षी बांधलेला आहे.सतार वादनाच्या प्रत्येक सुरा बरोबर,कंपना बरोबर तो फडफडतोय.. मुक्त होण्यासाठी.. आकाशात उंच उंच भरारी घेण्यासाठी..चित्रातील त्या महिलेच्या डोळ्यातील भाव तिच्या मनाची तगमग आणि पक्षाची फडफड एक सारखीच आहे..आणि असाच आपला त्या चित्राशी संवाद सुरु होतो.. शशिकांतच्या संवादाची ही भरारी पॅरिस पर्यंत पोहोचते आहे. त्याच्या या चित्र प्रवासाला " लोकमत" परिवाराचा सलाम !