सोलापूर - एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, पगारवाढ, महागाई भत्ता वाढावा आदी मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संप सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सरकार जर दुर्लक्ष करणार असेल, तर आम्हाला ST कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराच यावेळी दिला. चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ST मधील एका कर्चचाऱ्याचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आपल्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.
आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. सोलापूरमध्येही आज तेच चित्र पाहायला मिळालं. भाजप नेते चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर असताना काही कर्मचाऱ्यांना रडू कोसळलं. वाढती महागाई आणि नोकरीतून मिळणार कमी पगार, अनियमितता तसेच विविध समस्यांमुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. चंद्रकांत पाटील मीडियाशी संवाद साधत असतानाही या कर्मचाऱ्यांना रडू कोसळलं. आकाशी रंगाचा टी शर्ट घातलेला तरुण चंद्रकांत पाटील यांच्या पाठीमागे रडत असल्याचं दिसून येतंय.