सोलापूर : सोलापुरात घोंगडी बैठकीला आल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला. यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले असून, पोलीस अज्ञात व्यक्तीचा तपास करीत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून दगडफेक करणारा युवक कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर हे बुधवारी सकाळी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. दिवसभरात त्यांनी शहरातील विविध भागांत घोंगडी बैठका घेतल्या. दुपारी भवानी पेठ येथे घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पडळकर हे सायंकाळी या परिसरात आले. त्यांची गाडी मंदिराजवळ येताच गर्दीतून अज्ञात व्यक्तीने दगड फेकून मारला. हा दगड गोपीचंद पडळकर यांच्या गाडीच्या काचेवर पडला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. बैठकीला परवानगी देण्यात आली नव्हती, त्यामुळे पोलीस घटनास्थळी होते. पोलिसांनी तत्काळ गर्दी कमी केली. दगड नेमका कोणत्या दिशेने आला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बैठक न घेण्याची विनंती केली त्यामुळे पडळकर यांनी तेथील आयोजकांकडून सत्कार स्वीकारला आणि पुढे नगरसेवक सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी गेले. तेथून ते शासकीय विश्रामगृहावर गेले.
गोळ्या घातल्या, तरी घाबरणार नाहीमाझा आवाज जर कोणी अशा पद्धतीने बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो बंद होणार नाही. मला जरी गोळ्या घातल्या तरी मी माझी भूमिका मांडणार आहे. महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन स्वत:ला पुरोगामी म्हणून सांगणाऱ्या नेत्याचे हे राजकारण असल्याचा आरोप पडळकर यांनी केला.