- रवींद्र देशमुखसोलापूर : महाराष्ट्रातील साम्यवादी राजकीय चळवळ जिवंत ठेवणारे मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम (मास्तर) यांनी यंदाही आपलं लाल निशाण काँग्रेस, भाजप अन् शिवसेनेसमोर उगारलं आहे. या निवडणुकीत त्यांना काँग्रेसबरोबर भाजप - सेनेच्या वाढत्या बळाशी दोन हात करावे लागणार आहेत. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील संभाव्य तिरंगी अथवा चौरंगी लढत आपल्यासाठी कशी फायदेशीर ठरेल, याची मोर्चेबांधणीही त्यांनी सुरू केलेली आहे.
सोलापुरातील टेक्सस्टाईल, विडी आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या हितासाठी चळवळी करणाऱ्या आडम मास्तरांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. साधरण चार दशकांच्या वाटचालीत ते दोनवेळा नगरसेवक आणि तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. विधानसभेतील शेकापचे भाई गणपतराव देशमुख यांच्याबरोबरच सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात लौकिक आहे. ‘शहर मध्य म्हणजे मास्तर’ असं समीकरण त्यांच्या मतदारसंघात होतं; पण २००९ मध्ये ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या समीकरणाला छेद दिला अन् सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये मास्तरांना अपयशाचा सामना करावा लागला. मास्तर निवडणूक हरले तरी लाल निशाण जिवंत ठेवणं आणि सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, हेच राजकारणातील अन्य ज्येष्ठ डाव्या नेत्यांप्रमाणे त्यांचे ध्येय असल्याने निवडणुतील जय - पराजय त्यांच्या लेखी महत्त्वाचा ठरला नाही; पण निडणुका त्यांनी ताकदीनेच लढल्या. यंदाचीही निवडणुकीतही ते तितक्याच ताकदीने उतरले असल्याचे दिसून येत आहे.मोदींची प्रशंसा अन् आता लढतआडम मास्तरांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या सहयोगाने तीस हजार घरांची रे नगर वसाहत उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचे सोलापुरात भूमिपूजन झाले. या सोहळ्यात मोदी यांच्यावर स्तूतीसुमने उधळली होती. याची राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. यामुळे काही काळासाठी माकपच्या पॉलिट ब्यूरोने मास्तरांना पक्षाच्या समितीतून काही काळासाठी निलंबितही केलं होतं. पण कामगारांना त्यांच्या स्वप्नातील घरं देण्यासाठीच त्यांचे मोदींबाबतचे शब्द मधाळ झाले होते. हे आता स्पष्ट झाले असून, त्यांनी आता भाजपवरही शरसंधान साधण्यास प्रारंभ केला आहे नव्हे भाजपविरूध्द लढण्यास ते सज्ज झाले आहेत.काँग्रेसलाही केलं लक्ष्य..सोलापूर शहर मध्यमध्ये काँग्रेसकडून दोनवेळा पराभूत झाल्यामुळे आताही त्यांचा शत्रू नं. १ काँग्रेसचं आहे. त्यामुळेच बुधवारी झालेल्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यात आडम मास्तरांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. या निवडणुकीत त्यांना भाजप आणि सेनेच्या वाढत्या ताकदीचा सामना करावा लागत असल्याने मास्तरांना यंदा काँग्रेसबरोबर भाजप, सेनेवरही समान शक्तीचे बाण सोडावे लागतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.