साेलापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरू आहे. या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांनी प्रतिक्रिया देताना भिडे यांच्या मिशा कापू असा इशारा साेमवारी दिला. या प्रतिक्रियेवरुन नवा वाद हाेण्याची शक्यता आहे.
पवार गटाच्या महिला उपाध्यक्षा विद्या लाेलगे यांनी साेमवारी एका सामाजिक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी लाेलगे यांना संभाजी भिडे यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाउ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाउ नये. साडी घातलेल्या महिलांनीच जावे, असे भिडे म्हणाले हाेते.
यावर विद्या लाेलगे म्हणाल्या, संभाजी भिडे यांच्याकडून महिलांबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्ये केली जातात. त्यांना महिलांबद्दल बाेलायचा अधिकार काय आहे. कुणी काय करावे, काय करू नये हे सांगण्याचा अधिकार भिडे यांना कुणी दिली. हा माणूस केवळ लाेकांची माथी भडकावण्याचे काम करताे. भाजप, संघाच्या अनेक नेत्यांची मुले काेणती वेशभूषा करतात हे यांना माहिती आहे का? आम्ही यापुढील काळात त्यांची वक्तव्ये खपवून घेणार नाही. आम्ही महिला मिळून त्यांच्या मिशा कापून टाकू.