पंढरपूर : ५० वर्षे अन् तीन पिढ्यांचा संबंध असणारे पंढरपूरचे परिचारक व अकलूजचे मोहिते-पाटील यांच्यात २००९ मध्ये राजकीय वैरत्व आले, ते तब्बल १० वर्षे टिकले. परंतु ही दोन्ही घराणी राष्ट्रवादीपासून पूर्णत: दुरावून भाजपवासी होताच पुन्हा मनोमीलन झाल्याचे रविवारी आणि सोमवारी पंढरपुरात दिसून आले.
पंढरपूर बाजार समितीच्या आवारात रविवारी आयोजित भाजपच्या संकल्प मेळाव्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेत परिचारकांकडे मैत्रीचा हात पुढे केला व यास आ. प्रशांत परिचारक यांनीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिसाद दिला़ सकाळ उजाडताच सोमवारी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरीत येऊन माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांची वाड्यावर जाऊन भेट घेतली़ त्यानंतर पंढरपुरात दिवसभर धाकट्यांबरोबरच मोठेही पुन्हा एकत्र आल्याची चर्चा होती.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर परिचारक व मोहिते-पाटील गटात राजकीय संघर्ष सुरू झाला होता. पुढे मोहिते-पाटील विरोधकांची फळी निर्माण झाली व यास महाआघाडी नाव देण्यात आले. महाआघाडीचे प्रवर्तक संजय शिंदे सध्या राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे उमेदवार आहेत. परिचारक व शिंदे यांची दोस्ती ही सर्वश्रुत आहे. शिंदे हे राष्ट्रवादीत गेले असले तरी परिचारक व त्यांच्या अन्य महाआघाडीच्या नेत्यांनी भाजपमध्ये राहणे पसंत केले आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये आले आहेत़ ते उमेदवार नसले तरी भाजपसाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोहिते-पाटील व परिचारक यांना एकत्र काम करण्यासाठी आग्रह केला़ यातून विधानसभेला येथील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
मोहिते-पाटील अन् परिचारक यांच्यात चर्चा- रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी रविवारी पंढरपूर बाजार समितीमधील हॉलमध्ये परिचारकांसमोर पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला. त्यांनी पंतांचे आशीर्वाद घेतले. याच बाजार समितीच्या आवारात २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी परिचारक समर्थकांनी मोहिते-पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. यानंतर १० वर्षांनी आता पुन्हा याच बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेवेळी मोहिते-पाटील व परिचारक यांच्यात मनोमिलन झाले, हा योगायोग म्हणावा लागेल़ त्यानंतर सोमवारी सकाळी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरीत येऊन सुधाकरपंत परिचारक यांची भेट घेतली व त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. यावेळी उमेश परिचारक, वसंतराव देशमुख उपस्थित होते़