सांगोला: खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचा सांगोल्यातील वाढता संपर्क आणि भाजपा-शिवसेना नेतेमंडळींच्या सतत होणाºया भेटीगाठीमुळे सांगोल्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
खा. विजयदादांनी मंगळवारी सांगोल्यात आल्यानंतर दिवसभरात शेकापचे आ. गणपतराव देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. पी. सी. झपके, भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख, महायुतीच्या नगराध्यक्षा राणी माने, भाजपाच्या नेत्या राजश्री नागणे-पाटील यांच्यासह समर्थकांच्या भेटी घेऊन लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा केल्याचे समजते. मात्र त्यांनी या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ लावू नये, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. खा. विजयदादांनी गेल्या १५ दिवसांच्या कालावधीत शेकापचे आ. गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन दोन वेळा भेट घेतल्याने त्यांच्या या भेटीवरून राजकीय चर्चा होत आहेत.
माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांची उमेदवारी निश्चित होऊन विधानसभा मतदार संघातील नेतेमंडळी त्यांच्या प्रचारास लागले आहेत. माढा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अद्यापही निश्चित नसल्याने भाजपा-शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. फलटणचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशानंतर त्यांच्याही कार्यकर्त्यांनी सांगोल्यात येऊन भाजपा-शिवसेना पदाधिकाºयांच्या भेटी घेऊन चाचपणी केली होती.
खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मंगळवारी सकाळी नगरसेवक सतीश सावंत यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तेथून त्यांनी त्यांच्या समर्थकांच्या भेटी घेऊन आ. गणपतराव देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर माजी आ. शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन भाजपाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी श्रीकांत देशमुख यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करून राजकीय घडामोडींवर चर्चा केली. त्यानंतर नगराध्यक्षा राणी माने, नगरसेवक आनंदा माने, स्वाभिमानीचे प्रा. संजय देशमुख, माजी उपसभापती संतोष देवकते यांच्याही भेटी घेतल्या. खा. विजयसिंह मोहिते-पाटील मंगळवारी दिवसभर सांगोल्यात ठाण मांडून असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले होते.