आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने जिल्ह्याचे वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कमी वेळेत काम पूर्ण करण्याचा विक्रम करून जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या पाच महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या मिशनला गती दिल्यामुळेच उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा पदाधिकाºयांनी केला आहे. तर यापुढील काळात जिल्हा परिषदेचे प्रशासन हागणदारीमुक्तीसाठी जनजागृतीवर भर देण्यात येईल, असे स्वच्छ भारत मिशनच्या अधिकाºयांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या उद्दिष्टपूर्तीचे २४ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे पर्यावरण विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सादरीकरण केले जाणार आहे. २०१२ च्या बेसलाईन सर्व्हेनुसार जिल्ह्यात १ लाख १२ हजार ७३१ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होते. जिल्हा परिषदेच्या यापूर्वीच्या पदाधिकाºयांनी यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु, जिल्ह्यात या कामाला गती मिळत नव्हती. स्वच्छ भारत मिशन कार्यालयातील कर्मचारी जनजागृतीपर कार्यक्रम घेत होते. काम खरेच पूर्ण होते की नाही हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारने फोटो अपलोड करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार या कामाची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जात आहे. मे २०१७ पर्यंत बरेच काम बाकी होते. मुख्य कार्यकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पदभार घेतल्यानंतर या कामाला गती मिळाली. बुधवारी हे काम पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला.-------------------अनुदानाचा फायदा हागणदारीमुक्त गाव ही संकल्पना १९९९ पासून सुरू झाली. २००३ मध्ये सरकारकडून ६०० रुपये अनुदान दिले जात होते. पुन्हा १२०० रुपये, ३२०० रुपये अनुदान देण्यात आले. १ एप्रिल २०१२ ला सरकारमार्फत बेसलाईन सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर शौचालय बांधणाºया व्यक्तीला ४६०० रुपये अनुदान दिले जात होते. २ आॅक्टोबर २०१४ पासून लाभार्थ्याला थेट १२ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आणि अनेक ठिकाणी कामाला गती मिळू लागली.----------------------आम्हाला मार्च २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. परंतु, आम्ही त्यापूर्वीच काम पूर्ण केले आहे. माझे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विशेषत: जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे. बेसलाईन सर्व्हेच्या बाहेर असलेल्या सर्व कुटुंबांसाठी रोजगार हमी योजना, घरकुल योजना, दलितवस्तीच्या योजनेतून शौचालय बांधून देणार आहोत. स्वच्छतेची चळवळ पुढे चालू राहील. स्वच्छ, स्मार्ट गाव करण्यावर प्रशासनाचा भर राहील. - डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर.---------------------------------सीईओ डॉ. भारुड आणि त्यांच्या सहकाºयांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा आहे. हा जिल्हा परिषदेचा गौरव आहे. सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिले. शेवटच्या टप्प्यात अनेक गावात कामांना गती मिळत नव्हती. त्यासाठी त्यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागले. हे निर्णय चांगल्या कामासाठी होते. पुढील काळातही स्वच्छतेच्या चळवळीसाठी सर्व पदाधिकारी त्यांना सहकार्य करणार आहेत. - संजय शिंदे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर. --------------------------------दिशा बैठकीत अभिनंदनाचा ठरावखासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत आज दिशा सभा झाली. कमी कालावधीत शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. ----------------------
राज्यात विक्रम; सोलापूर जिल्ह्याचे शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण, १ लाख १२ हजार शौचालय बांधकाम पूर्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:25 PM
जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाने जिल्ह्याचे वैयक्तिक शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कमी वेळेत काम पूर्ण करण्याचा विक्रम करून जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ठळक मुद्देजिल्ह्यात १ लाख १२ हजार ७३१ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट होतेस्वच्छतेची चळवळ पुढे चालू राहील. स्वच्छ, स्मार्ट गाव करण्यावर प्रशासनाचा भर राहील : डॉ. राजेंद्र भारुडपुढील काळातही स्वच्छतेच्या चळवळीसाठी सर्व पदाधिकारी त्यांना सहकार्य करणार : संजय शिंदे