सोलापूर : जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ सप्टेंबर रोजी सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या जिल्ह्यात अलीकडील कालावधीत काही नवीन पर्यटन स्थळे, धार्मिक व ऐतिहासिक वास्तू पर्यटन विकसित झाली आहेत. मात्र त्याची जास्त प्रसिद्ध झाली नाही. या वर्षी अशा नव विकसित पर्यटन स्थळांना हायलाईट करण्यासाठी, त्यांचे मार्केटिंग करण्यासाठी या पर्यटन स्थळांना भेटी देऊन यंदाच्या वर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यातील १०० पेक्षा जास्त गावातील पर्यटनप्रेमी नागरिक वेगवेगळ्या पर्यटन ठिकाणाला भेटी देणार आहेत.
फाउंडेशनच्या समृद्ध गाव अभियान समितीचे तालुका व जिल्हा समितीचे सदस्य तसेच संचालक मंडळ, सल्लागार व जिल्ह्यातील विविध गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचासह शहरातील व शहराबाहेरील पर्यटन स्थळाला भेटी देणार असल्याचे आ. देशमुख म्हणाले. पर्यटन ठिकाणांना भेटी देऊन त्या ठिकाणी पर्यटनाला चालना देणारे व विविध स्तरावर पर्यटन वाढ व जाणीव जागृती करणे तसेच पर्यटन क्षेत्रात काम करणा-या संस्था, व्यक्तींसोबत परिसंवाद चर्चासत्रे, विविध पर्यटन पूरक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या पत्रकार संचालिका मयुरी वाघमारे- शिवगुंडे, सल्लागार अमित जैन, मुख्य समन्वयक विजय पाटील व सायक्लिस्ट फाउंडेशनचे सारंग तारे, अभिनय भावटनकर उपस्थित होते.
---
आ. देशमुखांकडून ११ तालुक्यातील ११ गावांना भेटी
पर्यटनदिनी गावांचे महत्त्व, त्याची माहिती होण्याकरिता स्वतः आमदार देशमुख ११ तालुक्यात ११ ऐतिहासिक गावाला भेट देऊन जिल्ह्यातील पर्यटनाचे मार्केटिंग, पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
---
टुरिझममेंट 2K21 स्पर्धेचेही आयोजन
या वर्षीच्या पर्यटन दिनानिमित्त सायक्लिस्ट फाउंडेशन, सोलापूर आणि सोलापूर सोशल फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने टुरिझममेंट 2K21 च्या स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. या स्पर्धेत सायकलस्वारास दिनांक २४, २५ व २६ सप्टेंबर या कालावधीत जास्तीत जास्त सायकलिंग करावयाचे असून सोलापूर जिल्ह्यातील कमीत कमी सहा पर्यटन स्थळांना भेटी द्यावयाच्या आहेत. जो सायकलिस्ट वरील गोष्टींची पूर्तता करेल त्याला सोलापूरचा सायकलिंगचा ब्रँड ॲम्बेसेडरची ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे.