सोलापूर : मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा प्रकारचा जातीचा उल्लेख असलेला सर्व समाज हा महाराष्ट्र शासनाने २५ मे, २००६ रोजीच्या शासन आदेशान्वये अधिकृतपणे प्रसिध्द इतर मागासवर्गाच्या यादी मधील अ.क्र. ८३ वर दर्शविलेल्या कुणबी या मुख्य जातीअंतर्गतच येते. त्यामुळे इ.मा.व. प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा याप्रमाणे सरसकट सर्व मराठयांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.या मुख्य मागणीसाठी अंतरवाली सराटी, जि. जालना येथून मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी माढा तालुक्यातील ३७ पेक्षा जास्त गांवानी राजकीय नेत्यांना गावबंदीच्या निर्णय जाहीर करून तशा आशयाचे डिजीटल बॅनर गावाच्या प्रवेशव्दाराजवळ लावले आहेत.
यामध्ये रणदिवेवाडी, वेताळवाडी, वडाचीवाडी (त.म.), भोसरे, रिधोरे, कुर्डू, कव्हे, दारफळ (सिना), भोगेवाडी, चिंचोली, शिंगेवाडी, बिटरगांव (ह), दहिवली, रोपळे (खुर्द), लव्हे, बारलोणी, सापटणे, तांबवे, सगांव यासह तब्बल ३७ पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे. या गांवामध्ये मराठा आरक्षणास पाठिंबा दर्शविणारे ठराव ग्रामसभेत घेणे, बॅनर लावणे अशा उपक्रमातून सक्रिय पाठिंबा दर्शविल्याचे दिसून येत आहे. तसेच गावात प्रवेश करण्यापूर्वी पुढा-यांनी स्वत:ची मानमर्यादा राखून प्रवेश करू नये, अन्यथा गांवातील मराठा समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल असा इशारावजा मजकूरही प्रसिद्ध केल्याचे दिसून येत आहे.