सोलापूर - सोलापूरातील गोरक्षकांनी बार्शी नगरपालिकेच्या कत्तलखानावर छापा टाकून ५ जनावरांना जीवदान दिले. सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या मदतीने टाकण्यात आलेल्या या धाडीत १८ जणांकडे ३५ हत्यारे आढळून आले. याप्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांची बालनिरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल असलेल्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बार्शी येथे अनेक दिवसांपासून पहाटेच्या सुमारास जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती मिळाली होती. याबाबतची माहिती मिळताच सोलापुरातील गोरक्षकांनी बार्शीत घटनास्थळाला भेटदेऊन पाहणी केली. या पाहणीत गोरक्षकांना धक्कादायक गोष्टी पहावयास मिळाल्या. जनावरांची सुटका करण्यासाठी गोरक्षकांनी पोलीसांची मदत घेण्यासाठी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ विशेष स्कॉडला कारवाईसाठी पाचारण केले. त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विशेष स्कॉड व गोरक्षकांनी कत्तलखान्यावर छापा टाकला. यावेळी १८ आरोपी ३५ हत्यारे, ५ जनावरेआढळून आली.
ही कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, स्कॉड पथकातील पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी मदत केल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत अखिल भारत कृषी गोसेवा संघ सोलापुर अध्यक्ष सुधीर बहिरवाडे, बजरंग दलाचे गोरक्षक प्रमुख योगिराज जाडगोणर, गोरक्षक प्रशांत परदेशी, प्रसाद झेडगे, किरण पगुंडवाले, पवन कोमाटी अनिल कटकम, यशंवत रेब्बा आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.