सोलापूर : वस्तूची खरेदी व कामे न करता ८ लाख ४९ हजार रुपयांच्या अपहार प्रकरणात ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले आहे, तर सरपंचास पदमुक्त करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीतील नागरिकांच्या रेट्यामुळे कारवाई करणे जिल्हा परिषद प्रशासनाला भाग पडले आहे.
माजी सरपंच सुभद्राबाई घोडके, नितीन गव्हाणे, कमल माने, मेघा खटकाळे, रामचंद्र कोकाटे या ग्रामपंचायत सदस्यांनी व विशाल वाघमारे यांच्या तक्रारीवरून बिडीओंनी चौकशी केली होती. चौकशीत अपहार केल्याचे स्पष्ट झाल्याने पाच महिन्यांनंतर ग्रामसेवक नितीन चौधरी यांना निलंबित केले. सरपंच शिवनेरी धनराज पाटील यांनाही जबाबदार धरण्यात आले असून, ग्रामपंचायत अधिनियम ३९ अन्वये पदमुक्त करण्यासाठी प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
...तर कारवाई झाली नसती - अंगणवाडी व प्राथमिक शाळेसाठी सरळ साहित्य खरेदी केले नाही, विविध ठिकाणी कामेही केली नाहीत. मात्र, १५व्या वित्त आयोगाचे ९ लाख ९६ हजार व ग्रामनिधीचा अपहार केला. ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीनंतर बिडीओ महेश पाटील व विस्तार अधिकारी सोमनाथ शिंदे यांनी चौकशी करून अहवाल झेडपी ग्रामपंचायत विभागाला जून महिन्यात पाठविला होता.
प्रशासन कारवाई करीत नसल्याने राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी कारवाई करण्याची सूचना केली. ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकरी अनेक वेळा सीईओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे यांना भेटले. सतत दबाव व आंदोलनाचा इशारा दिल्याने तब्बल ५ महिन्यानी ग्रामसेवक नितीन चौधरी यांना निलंबित केले.