कामती : मोहोळ तालुक्यातील एकूण एकशे चार गावांपैकी सत्तावीस गावे सध्या कोरोनामुक्त झाली आहेत. या गावात कोरोनाचा सध्या एकही रुग्ण नाही, तर २१ गावे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत. या गावात केवळ प्रत्येकी एक - दोन रुग्ण उपचार घेत आहेत. गावात योग्य उपाययोजना केल्याने या गावकऱ्यांनी कोरोनावर मात केली. म्हणून या गावचे ‘कारभारी लय भारी, योग्य उपाययोजना आल्या कामी’ असा बोलबाला झाला आहे.
ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. परंतु ग्रामपंचायत स्तरावर शिस्तीचे पालन, नियोजनबद्ध काम व योग्य उपचार करून तालुक्यातील २७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाने वेळीच घेतलेली काळजी कामी आली आहे. फक्त एक रुग्ण असलेल्या १३ ग्रामपंचायती आहेत. त्याचबरोबर दोन रुग्णसंख्या असणाऱ्या एकूण आठ ग्रामपंचायती आहेत. एकंदरीत या २१ गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल चालू आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना गर्दी करू न देणे, हायपोक्लोराईडची गावात वेळोवेळी फवारणी करणे, विनामास्क दंड आकारणे, मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करणे, त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येणाऱ्या प्रत्येक नियमाचे तंतोतंत पालन करणे, या नियमांच्या जोरावर तालुक्यातील गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
-----
...ही आहेत कोरोनामुक्त गावे
२१ मेच्या प्राप्त वैद्यकीय अहवालानुसार वाघोलीवाडी, परमेश्वर पिंपरी, दादपूर, तरटगाव, लमाणतांडा, हराळवाडी, विरवडे खुर्द, शिरापूर मो., पोफळी, कोंबडवाडी, पसलेवाडी, मसले चौधरी, सारोळे, भोयरे, घाटणे, दाईगेवाडी, मलिकपेठ, मनगोळी, वाळूज, भोपले, एकुरके, नांदगाव, चिखली, कुरणवाडी (आष्टी), सिद्धेवाडी, भैरववाडी, विरवडे खुर्द.
कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारी गावे
वडाचीवाडी, हिवरे, नालबंदवाडी, कोथाळे, अरबळी, खवणी, शिंगोली, कोरवली, जामगाव खुर्द, मुंडेवाडी, डिकसळ, पीरटाकळी, कोन्हेरी, यावली, गलांडवाडी, वरकुटे, अर्धनारी, कामती बुद्रुक, रामहिंगणी, आष्टे, खुनेश्वर.
----
मोहोळ तालुक्यात एकूण २७ गावे कोरोनामुक्त, तर २१ गावे कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. या गावातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या मदतीने हे शक्य झाले आहे. हात धुणे, मास्क वापणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करावा.
-अरुण पाथरूडकर, तालुका आरोग्याधिकारी, मोहोळ
----
मोहोळ तालुक्यातील या २७ गावांच्या कोरोना विषाणू दक्षता समितीने उल्लेखनीय काम केले आहे. शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या नियमांचे पालन केल्यास तालुका कोरोनामुक्त होईल.
- जीवन बनसोडे, तहसीलदार, मोहोळ
---