रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ हा वाटंबरे गावातून जात असल्याने येथे उड्डाणपुलाची निर्मिती होत आहे. मात्र, उड्डाणपुलामुळे गावाची पूर्व व पश्चिम बाजूला विभागणी होत असल्याने ग्रामस्थांसाठी गैरसोय झाली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूला गावठाण, तर दुसऱ्या बाजूला पवारवाडी, दऱ्याबा वस्ती, शेरे वस्ती, शिंदे मळ्यासह वाड्या-वस्त्यांचा समावेश होत आहे.
या भागातील लोकांच्या दैनंदिन गरजा भागविणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, दवाखाने, धार्मिक स्थळे ग्रामपंचायतसह तलाठी कार्यालय, प्रशासकीय कार्यालय, स्मशानभूमी अशी सुविधा गावठाण भागात येते, तर जत-पिलीव हा जिल्हा मार्ग वाटंबरे गावातील राष्ट्रीय महामार्गास मिळत असल्याने उड्डाणपुलाखाली बोगद्याची गरज असतानादेखील तो संबंधित ठेकेदाराकडून निर्मिती केला नाही. वाटंबरेतील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून ग्रामपंचायतीमार्फत उड्डाणपुलाखाली बोगद्याच्या निर्मितीसाठी ग्रामसभेत ठराव घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाकडे पाठविला आहे. त्यासाठी वारंवार लेखी अर्ज देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाटंबरे गावातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली बोगद्याची निर्मिती न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.