मांडेगाव परिसरातील पाच गावच्या कोरोना रुग्णांना दवाखान्यात ने-आण करण्यासाठी सरपंच पंडित मिरगणे यांनी स्वतःची गाडी उपलब्ध करून दिली आहे. मांडेगाव, बेलगाव, खडकलगाव, ताडसौंदणे, व्हळे शेलगाव या गावातील कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी वाहन मिळत नाही. तरी त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा. त्यातून ते त्यांच्या गाडीतून मोफत दवाखान्यात पोहोच करीत आहेत.
बार्शी शहर आणि तालुक्यात सध्या संचारबंदी असल्याने सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची धावपळ होऊ नये म्हणून पंडित मिरगणे यांनी ही सोय केली आहे.
विशेष म्हणजे या गाडीचे सारथ्य ते स्वतः सरपंच करीत आहेत. सरपंच पंडित मिरगणे यांच्या समाजोपयोगी कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार, बक्षिस प्राप्त झाले आहेत. त्यांना लोकमतचा राज्यस्तरीय सरपंच अवार्ड पुरस्कार मिळालेला आहे.