शंभूलिंग अकतनाळ चपळगाव : पोटात गाळ साचल्यामुळे कोरडे पडलेल्या कुरनूर धरणाच्या पुनरुज्जीवनासाठी गावकरी सरसावले आहेत. तलावात साठलेला गाळ काढण्यासाठी गावकरी एकत्रित आले असून, या कामाला सोमवारपासून सामूहिकपणे सुरुवात झाली आहे.‘लोकमत’ने कुरनूर धरणाच्या सध्याच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारी मालिका प्रकाशित केली होती. त्याची दखल घेऊन गावकरी स्वयंप्रेरणेने पुढे आले आहेत. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणिवेचे हे यश असल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहेत.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणात जेमतेम तेवीस टक्केच पाणीसाठा झाला होता. भविष्यात ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्थांसह शेतकरीवर्गाने गाळ काढावा, या हेतूने चपळगावातील बळीराजांनी एकत्रित येऊन कुरनूर धरणातील गाळ काढण्यास प्रारंभ केला आहे.
चपळगावचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवठे यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आगामी पावसाळ्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
धरणात दूरवर गाळाचे साम्राज्य पसरले असून, लोकसहभाग आणि शासकीय पातळीवरून चालना मिळाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा होऊ शकतो. सद्यस्थितीत एक पोकलेन आणि दहा टिपरच्या माध्यमातून गाळ उपसा करण्यात येत आहे. आगामी काळात गाळ उपसा वाढल्यास यंत्रसामुग्री वाढवणार असल्याचे सिद्धाराम भंडारकवठे यांनी सांगितले. यावेळी विकास मोरे, चंदू माशाळे, विजय कोरे, प्रशांत पाटील, शिवबाळप्पा कल्याणशेट्टी, रवी कोरे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने हजर होते. आभार विजय कोरे यांनी मानले.
एक ब्रास म्हणजे २८३२ लिटर पाणी वाढणार...!- कुरनूर धरणातून सध्या गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. ही मोहीम लाखमोलाची ठरणार आहे. कारण एक ब्रास गाळ काढल्यानंतर त्या ठिकाणी भविष्यात जवळपास २८३२ लिटर पाणीसाठा वाढणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ काढल्यास मोठ्या पटीने पाणीसाठा वाढणार आहे. याचा फायदा होईल. पहिल्या दिवशी ५५० ब्रास गाळ उपसा करण्यात आला.
लोकमतची लोकोपयोगी पत्रकारिता अक्कलकोट तालुक्याची तहान भागविणार आहे. कुरनूर धरणात गाळ वाढल्याने प्रत्यक्ष पाणीसाठा कमीच आहे. गाळ काढल्यानंतर प्रत्यक्ष पाणीसाठा वाढणार आहे.- चंद्रकांत माशाळे, शेतकरी
सद्यस्थितीत कुरनूर धरणातील गाळ शेतात टाकण्याची मनी इच्छा आहे. परंतु आर्थिक बाब दुबळी ठरत आहे, मात्र गाळ काढण्यासाठी शासनाकडून मदत मिळाली तर माझ्या शेतात गाळ टाकणार आहे.- शिवबाळप्पा कल्याणशेट्टी
सोमवारपासून कुरनूर धरणातील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली. सर्वप्रथम मी माझ्या शेतात गाळ टाकणारा पहिला शेतकरी ठरलोय याचा मनस्वी आनंद होत आहे.- राजशेखर ममदापुरे, शेतकरी
‘लोकमत’च्या मालिकेनंतर गाळ काढण्याची मोहीम हाती घेणे गरजेचे वाटले. याविषयी गावातील शेतकºयांशी चर्चा केली. सर्वांनी होकार दिल्यानंतर जुळवाजुळव करून आम्ही गाळ काढण्याची मोहीम सुरू केली आहे.- सिद्धाराम भंडारकवठे