सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमाच्या कामगारांना १४ महिन्यांचे थकीत वेतन मिळावे यासाठी कामगार आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी सकाळी जुळे सोलापुरातील उंचावरील टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. सोमवारी रात्री कामगार या टाकीवर मुक्कामी होते. जोपर्यंत पगाराचा निर्णय होत नाही तोपर्यंत खाली येणार नाही. असा निर्धार कामगारांनी केला आहे. दरम्यान, या कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मनपा पदाधिकारी आणि प्रशासनाने बैठक घेतली. त्यात तोडगा निघाला नाही.
थकीत वेतन मिळावे यासाठी कामगारांनी २८ जूनपासून संप पुकारला आहे. शहरातील सिटी बससेवा बंद आहे. परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. मनपाकडून परिवहनला विशेष निधी दिला जातो. त्यातून कामगारांच्या पगारी होतात. मनपाचे अंदाजपत्रक ९ जुलै रोजी मंजूर होणार आहे. अंदाजपत्रकानंतर वेतनावर तोडगा काढू, असे मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले आहे. यादरम्यान, सोमवारी जुळे सोलापुरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. टाकीवर तिरंगा फडकाविण्यात आला. कामगारांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी खाली यावे यासाठी पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले, परंतु कामगार खाली येण्यास तयार नव्हते.
जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराजे खलाटे, जिल्हाप्रमुख दत्तात्रय मस्के-पाटील, प्रहार अपंग क्रांतीच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, शहर संपर्कप्रमुख जमीर शेख, शहरप्रमुख अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालिद मनियार, उपप्रमुख मुश्ताक शेदसंदी, सचिन वेणेगूरकर, परिवहन संघटनेचे देविदास गायकवाड, आर.एम. मकानदार, अनिल चौगुले, शाकीर उस्ताद, विजय गायकवाड, नागेश म्हेत्रे, शिवपुत्र अजनाळकर आदी उपस्थित होते. सोमवारी रात्री कामगार टाकीवरच बसून होते. काही कार्यकर्त्यांनी जेवण आणले. टाकीवरच बसून जेवण उरकण्यात आले. मंगळवारी आंदोलन कायम राहणार आहे.
पावसात भिजल्याने एकाची प्रकृती बिघडली- सकाळी १५० कामगार टाकीवर चढले. दुपारचे जेवण सर्वांनी मिळून केले. तहान लागल्याने काही लोकांनी पाण्याच्या टाकीत उतरुन पाणी आणले. त्यानंतर काही वेळाने एक पाण्याचा जार मागविण्यात आला. दुपारी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. कामगार आणि प्रहारचे पदाधिकारी जागेवरुन हलले नाहीत. पावसात भिजल्याने वाहक दत्तात्रय बारड यांची प्रकृती बिघडली. त्यांना ताप येऊन चक्कर आली. पोलिसांनी त्यांना खाली उतरविले. खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी कामगार तिथेच बसून होते. थंडीने कुडकुडत होते. अनेकांना डासांचा त्रासही सहन करावा लागत होता.
प्रशासनाचा तोडगा कामगारांना मान्य नाही - कामगारांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महापौर कक्षात दुपारी १२ वाजता बैठक झाली. महापौर शोभा बनशेट्टी, मनपा आयुक्त दीपक तावरे, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे, परिवहन समितीचे सभापती गणेश जाधव, अनंत जाधव, नगरसेवक अमर पुदाले, राजेश काळे, परिवहन सदस्य परशुराम भिसे, तिरुपती परकीपंडला आदी उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्तांनी एक महिन्यांचा पगार तत्काळ देण्याची आणि मनपाचे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर उर्वरित तीन महिन्यांच्या पगाराबाबत विचार करण्याची तयारी दर्शविली. पण कामगार चार महिन्यांच्या वेतनावर ठाम राहिले. त्यामुळे या बैठकीत तोडगा निघाला नाही.