मंगळवेढा : माचणूर येथील अल्पवयीन मुलगा प्रतिक शिवशरण नरबळी प्रकरणातील आरोपी नानासाो डोके याच्या निधनानंतर मृतदेह गावात अंत्यविधीसाठी आणण्यास काही लोकांनी विरोध केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे यांनी संबंधित लोकांचे मनपरिवर्तन करून त्या मृतदेहावर रात्री 1.00 वा शांततापूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
27 ऑक्टोबर 2018 रोजी प्रतिक शिवशरण या बालकाचा नरबळी देण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर पसरल्याने आरोपीच्या अटकेसाठी विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. बालकाचा श्रध्देपोटी बळी दिल्याने संपूर्ण राज्य ढवळून निघाले होते.या घटनेनंतर काही मंत्री महोदयांनी शिवशरण कुटुंबियांची भेट घेवून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला होता.
गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलिस निरिक्षक विजय कुंभार यांनी सुतावरून स्वर्ग गाठत एका लहान मुलासह अन्य दोन आरोपींना ताब्यात घेतले होते.लहान बालकास सोलापूरच्या सुधारगृहात ठेवण्यात आले होते. नंतर त्याची सुटका करण्यात आली. तर अन्य दोन आरोपींना जामीन न मिळाल्याने ते आजतागायत कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यातील आरोपी नानासाो डोेके यांचा आजाराने मृत्यू झाला.त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी माचणूर गावाकडे येत असल्याची खबर गावातील लोकांना मिळाल्यानंतर काहींनी मृतदेह गावात आणण्यास विरोध असल्याची पोस्ट समाजमाध्यमावर प्रसिध्द केली होती.
गावात तणावपूर्ण वातावरण बनत असल्याने याची दखल घेवून सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूराव पिंगळे यांनी पोलिस कर्मचार्यांसह माचणूर गाव गाठून गावातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक बोलावून त्यांचे मनपरिवर्तन करून रात्री एक वाजता त्या मृतदेहावर शांततापूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.