सोलापूर : भारताच्या इतिहासात आपल्या शूर सैनिकांनी नेहमीच देशाच्या अभिमानासाठी सर्वस्वाचा त्याग केला. देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनीही आपल्या प्राणाची आहुती दिली आणि हुतात्मा झाले. शिवाय भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक युद्धे झाली. यापैकीच एक असलेल्या कारगिल युद्धातील वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापूरचा सुपुत्र विनायक ओंकारनाथ गाये याने मोटारसायकलवरून ६६०० किलोमीटरचा प्रवास केला.
दरम्यान, कारगिल येथील वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विनायक गाये हा १३ जून २०२३ रोजी मोटारसायकल प्रवासाला सुरूवात केली. लेह-लडाखपर्यंत मोटरसायकलवरून ६६०० कि.मी. प्रवास केला. विनायक याचे शालेय शिक्षण भारती विद्यापीठात पूर्ण झाले. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण संगमेश्वर महाविद्यालयात त्याने पूर्ण केले. सध्या तो यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी. कॉम.चे शिक्षण घेत आहे. विनायक हा महावितरणमधील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, झोन पदाधिकारी ओंकारनाथ गाये यांचा मुलगा आहे.
विनायक गाये याने सोलापूर-धुळे-इंदूर-जयपूर-पठाणकोट-श्रीनगर-कारगिल शहीद स्मारक-लेह-लडाख- मनाली-चंडीगड-अजमेर-उज्जैन-नाशिकमार्गे २९ जून २०२३ रोजी सोलापूरला परत आला. सोलापूर ते लडाख मोटारसायकलवरून एकट्याने प्रवास करून येणारा विनायक हा सोलापूर जिल्ह्यातील पहिला तरुण आहे.