सोलापूर : विविध सार्वजनिक उत्सवाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शस्त्रबंदीचा आदेश बजावलेला असताना दुर्गा माता दौड यात्रेत तलवारीसारखे शस्त्र वापरुन आदेशाचे उल्लंघन केले म्हणून दहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
ही घटना मंगळवारी सकाळी ८:१५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शआस आली. पोलीस अंमलदार कृष्णात गुंडू यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुरुषोत्तम गुरुनाथ कारकल, ओंकार नितीन देशमुख, अभिषेक इंगळे, समीर बबनराव पाटील, ऋषिकेश निलेश धाराशिवकर, व इतर चार ते ५ अशा गुन्हा नोंदलेल्याची नावे आहेत.
पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये १९ ऑक्टोबर रोजी शहर हद्दीत २१ ते ४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शस्त्रबंदीचा आदेश बजावला होता. संयोजकांनी दुर्गा माता दौडसाठी परवानगी देताना पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दौडमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगता येणार नाही अशा सूचना केल्या होत्या. असे असतानाही या आदेशाचे पालन न करता दौडमध्ये हातात लोखंडी तलवार बाळगल्याबद्दल दहा जणांविरुद्ध कायदेशीर फिर्याद नोंदली आहे. अधिक तपास दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख करीत आहेत.