वैराग : ढोराळे (ता. बार्शी) येथील देशमुख नामक एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेमध्ये हिंस्र प्राण्याचे दर्शन झाले. हा वन्य प्राणी बिबट्या, तरस, लांडगा की, काय हे समजू शकले नाही. तरी वनविभागाने या गोष्टीची गंभीर दखल घेतली. वनअधिकारी एच. बी. कोकाटे यांनी हा प्राणी तरसच असू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन केले.
ढोराळे येथील शेतकरी अप्पासाहेब देशमुख यांच्या द्राक्ष बागेमध्ये गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा गडी रामचंद्र भिरड यांना एक वन्य प्राणी बोकडावर हल्ला करून त्यास खात असल्याचे दिसले. तत्पूर्वी योगानंद कोल्हे यांना त्याच्या शेजारील ज्वारीमध्ये अशा प्राण्याचे दर्शन झाल्याचे सांगितले. त्याप्रमाणे भिकाजी डफळे यांनीदेखील असा हिंस्र प्राणी पाहिल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी ढोराळे येथे एका कुत्र्यावर अज्ञात प्राण्याने हल्ला करून मारले होते. तर गुरुवारी तो बकरे खात असल्याचे दिसून आले. त्यामुळे या घटनेची वनविभागाने गंभीर दखल घेत प्रत्यक्ष पाहणी केली.
---
अफवा पसरवू नका!
यापूर्वी गावातील एक बकरे मृत झाल्याने ते टाकून दिले होते. बिबट्या मेलेली जनावरे खात नाही. तो तरसच खाऊ शकतो. त्यामुळे हा प्राणी तरस आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणीही अफवा पसरवू नये, असे अवाहन वन अधिकारी एच. बी. कोकाटे यांनी केले आहे.
----
----