जगन्नाथ हुक्केरी/ सोलापूर : दाक्षिणात्य गाण्यावर विचित्र हावभाव करीत बेधुंद होऊन उत्तरप्रदेशातील एका लग्न समारंभाच्या मिरवणुकीत एक साधू नृत्य करीत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याचा संबंध सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्याशी जोडून त्यांच्या नावावर खपवला जात आहे. हा व्हिडिओ पहिल्यांदा यू ट्यूबवर प्रसिद्ध झाला आहे. त्याला ‘फेक साधू डान्स’ असे कॉमेंटस् पडले आहेत.
सोलापूर लोकसभेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर हा व्हिडिओ सोलापूरसह कर्नाटक व मुंबई, ठाण्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही जणांनी तर चक्क हा साधू म्हणजे सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवारच आहेत, असा तर्क लावला आहे. यातून त्या उमेदवाराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचा आरोप त्यांच्या भक्तांनी केलाय; मात्र डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी व या व्हिडिओचा काहीच संबंध नसल्याचे कार्यकर्त्यांच्या सर्चमध्ये समोर आले आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ १ ऑगस्ट २०१३ रोजी यू ट्यूबवर प्रसिद्ध झाला. त्यात ‘मेरे पिंजरे में पोपट बोले’ व ‘बदले मे युपी बिहार ले ले’या गाण्यांवर हा साधू नृत्य करीत आहे. त्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ २७ जुलै २०१३ रोजी प्रसिद्ध झाला. त्यातही हीच गाणी होती, तर आता निवडणुकीच्या तोंडावर मूळ गाणी बदलत त्यात मिक्सिंग करून कन्नड गाण्यावर साधू नृत्य करीत आहेत, असे भासविण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला साधू नृत्याचा व्हिडिओ व डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा काहीच संबंध नसल्याचे त्यांचे भक्त व भाजपचे कार्यकर्ते सर्वांना सांगत आहेत.
शिवाचार्यरत्न डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे संन्याशी व अध्यात्मजीवी आहेत. ते विद्यावाचस्पतीही आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने त्यांची बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. विरोधकांनी अशा कितीही क्लुप्त्या केल्या तरीही त्यांची प्रतिमा मलीन होणार नाही. अखिल मानव कुळाला जीवन संदेश देणारे ते महास्वामी आहेत. जनमाणसामध्ये त्यांच्याविषयी श्रद्धाभाव आहे, तो तसाच राहणार आहे.-रामेश्वर बिराजदार,महास्वामींचे भक्त, सोलापूर
पाहा व्हिडीओ -