सोलापूर : डफरीन चौक परिसरातील एका खाजगी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने आपल्याला इंजेक्शन देऊन मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कदम नावाच्या रुग्णाने केला आहे. या रुग्णाचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. परिचारिकेचा विनयभंग करून हा कोरोना रुग्ण पळाल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.
या व्हिडिओमध्ये महेश कदम म्हणतोय की, २२ एप्रिल रोजी मी या रुग्णालयात दाखल झालो होतो. माझा प्रकृतीमध्ये कसलाही फरक पडलेला नाही. रुग्णालयात चांगले उपचार होत नाहीत. केवळ पैसे भरायला सांगितले जात आहे. ऑक्सिजन पाहिजे असेल तर पन्नास हजार रुपये द्या. व्हेंटिलेटर पाहिजे असेल तर दोन लाख रुपये द्या. औषध-गोळ्या हव्या असतील तर दहा हजार रुपये द्या, असे सांगितले जाते. पाचशे रुपयाची वस्तू मागवायची असेल तर दोन हजार रुपये मागितले जातात. डॉक्टरही भेटत नाहीत. बाथरूममध्ये पाणी नाही. याबद्दल रुग्णालयाच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रार ऐकून घेतली नाही. तुझ्यासारखे खूप पाहिले आहेत. राहू वाटले तर राहा अन्यथा निघून जा, असे सांगितले. आम्ही इंजेक्शन देऊन तुझ्यासारख्या अनेकांना मारले आहे, अशी धमकी दिली. तुला उपचार घ्यायचे असतील तर घे. तू आमच्या हॉस्पिटलचे काही वाकडे करू शकत नाही, अशी भाषा वापरली. दहा ते पंधरा लोकांचा स्टाफ घेऊन अंगावर मारायला येतात. डिस्चार्ज द्या म्हटलं तरी देत नाहीत. मला त्वरित डिस्चार्ज मिळावा अशी मागणी या तरुणाने केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी होईल. अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येईल.
- धनराज पांडे, उपायुक्त, महापालिका.
------