भीमानगर : पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर सतत पडणाऱ्या दमदार पावसामुळे दौंड व बंडगार्डनमधून उजनीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत उजनी धरण ७४ टक्क्यांवर पोहोचली आहे.
पुणे जिल्ह्यातील १९ धरणांपैकी पानशेत, चासकमान, पवना, डिभे, मुळा मुठा, खडकवासला यांसह दहा धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्यामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने वधारली आहे. दौंडमधून मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २१५२५ क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे. तर बंडगार्डनमधून १८९७० क्युसेकनी आवक सुरू होती. मंगळवारी दिवसभरात उजनी धरणाच्या पाणीपातळीत चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
दरम्यान, नीरा खोऱ्यातील सर्वच धरणे हाऊसफुल्ल झाली आहेत. नीरा नदीला ३२००० क्युसेकने पाणी सोडल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. हीच नदी पुढे नरसिंगपूर येथे नीरा-भीमा नदीचा संगम होतो. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीकाठचा भाग पुन्हा जलमय होणार आहे.
यामुळे प्रशासनाने तशा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत.
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणीपातळी ४९५.५०५ मीटर
एकूण पाणीसाठा २८९९.६४ दलघमी (१०२.५० टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा दलघमी ३८.७६ टीएमसी
टक्केवारी ७४ टक्के
.........
उजनीत येणारा विसर्ग
बंडगार्डन १८९७०
दौंड २१५२५
..........
उजनीतून जाणारा विसर्ग
बोगदा १०५
दहिगाव ८४
सीना-माढा २२२