विठ्ठल कॉर्पोरेशनतर्फे वाहनांना बसविले रिफ्लेक्टर
कुर्डूवाडी : माढा तालुक्यात म्हैसगाव येथील विठ्ठल काॅर्पोरेशन लिमिटेड कारखाना स्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोलापूर आरटीओ कार्यालयाच्या वतीने रिफ्लेक्टर बसविण्यात आले. सहायक निरीक्षक प्रवीण संपगे, वरिष्ठ लिपिक पाटील यांनी उपस्थित वाहनचालकांना मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जमदाडे, जनरल मॅनेजर भारत रोकडे, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, केनयार्ड सुपरवायझर अजिनाथ गोडगे, सुरक्षा अधिकारी सचिन शिंदे उपस्थित होते.
वाळूज परिसरात रानडुकरांचा हैदोस
वाळूज : वाळूज व परिसरातील देगाव, भैरेवाडी, मनगोळी शिवारात रानडुकरांनी पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून हैदोस घातला आहे. वाळूज परिसरात रब्बी ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. सध्या ज्वारीचे पीक चांगले आले आहे. परंतु, ज्वारीची धाटे अर्धवट कुरतडून टाकली आहेत. परिसरामध्ये गहू, हरभरा, कांदा, गवारी, भुईमूग पिकांचे नुकसान झाले आहे. सध्या परिसरात ऊसतोडणी हंगाम चालू आहे. त्यामुळे रानडुकरांना लपण्यासाठी जागा नाही. परिसरामध्ये रात्री-अपरात्री सैरावैरा धावत आहेत. गतवर्षी वाळूज येथील दोन शेतकऱ्यांना चावा घेतला होता. लहान मुलांना रानडुकरांपासून धोका आहे. त्यामुळे वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी दादासाहेब गोरे, इंद्रसेन मोटे, उत्कर्ष मोटे, बळीराम सुसलादे, बजरंग पाटील यांनी केली आहे .
वाळूज ग्रामस्थांची रॅपिड कोरोना टेस्ट
वाळूज : ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमांतर्गत वाळूज येथील व्यावसायिकांची कोरोना रॅपिड टेस्ट कॅम्प अंतर्गत तपासणी करण्यात आली . सर्व अहवाल निगेटिव्ह आले. किराणा दुकानदार, औषध विक्रेते, सराफ व्यावसायिक, हॉटेलधारक, डॉक्टर, बांधकाम कामगार यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळी डॉ. समीर पटेल, ग्रामसेवक मानसिंग जाधव, जे. आर. शेख, भारती नगूरकर, वंदना कादे, सुमन कुंभार यांनी परिश्रम घेतले .