सोलापूर : शासकीय कामांमध्ये सर्वाधिक व्यस्त असणारे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून गुरुवारी माणुसकीचे दर्शन घडले. राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी करता पंढरपूरकडे जाताना त्यांना रस्त्यावर विव्हळत पडलेले अपघातग्रस्त नागरिक दिसले. अपघातग्रस्तांना पाहून त्यांनी लगेच त्यांची गाडी थांबवली. शासकीय लवाजमा बाजूला सारत त्यांनी जखमींना शासकीय वाहनातून मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त नागरिकांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राणदेखील वाचले.
एमएच-१३ बी. एन. ५१७७ या क्रमांकाच्या स्विफ्ट कारने दुचाकीवरून निघालेल्या तिघांना जोराची धडक दिली. यात सुभाष कोकाटे, जनाबाई कोकाटे, केराबाई कोकाटे हे गंभीर जखमी झालेत. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास पोखरापूरजवळील सारोळे पाटी येथे घडली. याच दरम्यान जिल्हाधिकारी शंभरकर हे अपघातग्रस्तांना पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांची गाडी थांबवली. गाडीतून उतरत त्यांनी जखमींकडे धाव घेतली. जखमींची विचारपूस करत त्यांना त्यांच्यासोबत असलेल्या दुसऱ्या एका शासकीय वाहनात जखमींना बसवले आणि उपचाराकरिता तिघांना मोहोळ ग्रामीण रुग्णालयकडे रवाना केले. रुग्णालयातील डॉक्टरांना फोन लावून जखमींना योग्य उपचार करण्याचा आदेशदेखील दिला.
तीनच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. तिसऱ्याच दिवशी रस्ते अपघातातील जखमींना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिवसभर केली चौकशी
जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी त्यांच्या पुढच्या दौऱ्याकडे रवाना झाले. दौरा संपून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येताना त्यांनी जखमींची फोनवरून विचारपूस केली. डॉक्टरांशी संवाद साधला. रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज संपून घरी जाताना पुन्हा त्यांनी जखमींची विचारपूस केली. त्यांच्या या स्वभावाचे कौतुक होत आहे.