मंद्रुप : ढोल, चळ्ळम, हलगीचा कडकडाट, भंडाºयाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी, वडापूर येथील भीमा नदी तीरावर प्रभूलिंग मंदिराशेजारील पालखी तळावर हजारो भाविकांच्या साक्षीने १२ पालख्यांचा नयनरम्य पालखी भेट सोहळा रंगला़ पालख्या उंच करून भेट घेताना भाविक टाळ्या वाजवून आनंदोत्सव साजरा करीत होते़ हा भेट सोहळा दोन तासांहून अधिक वेळ चालला.
वडापूरचे (ता़ द़ सोलापूर) ग्रामदैवत प्रभूलिंग देवाच्या यात्रेस ५ मार्चपासून प्रारंभ झाला़ दुपारी ३ वाजल्यानंतर एकेक पालखी आपापल्या वाहनातून पालखी तळावर दाखल होत होत्या़ बरोबर ४ वाजता वडापूर प्रभूलिंग व मिरी प्रभूलिंग या दोन पालख्यांचा भेट सोहळा झाला़ तेथे श्री जय आदिमाता यल्लम्मादेवीचा झगाही उपस्थित झाला़ त्यानंतर एकेक करीत श्री गेनसिद्ध (कुंभारी), श्री मळसिद्ध व मलकारसिद्ध (मंद्रुप), श्री मलकारसिद्ध (सोरेगाव), श्री अमोगसिद्ध (विंचूर), श्री कंटीसिद्ध (जिगजेणी, कर्नाटक), श्री अमोगसिद्ध (कुसूर), श्री ओगसिद्ध (सिद्धापूर), श्री रंगसिद्ध-चिमराया (तामदर्डी), श्री पिंडवडिया (बोराळे) या सर्व पालख्या दाखल होताच पालखीचे पुजारी ढोल, चळ्ळमचा निनाद अन् हलगीच्या कडकडाटावर पालखी उत्साहात नाचविण्यात मग्न होत होते़ गजीढोलाचे विविध प्रकारचे सादरीकरणही होत होते़ पुजारी पालखी घेऊन पालखीतळाला गोल रिंगण करायचे तर कधी उंच उचलून अन्य पालख्यांची भेट घ्यायचे.
हा अनुपम्य पालखी भेट सोहळा हजारो भाविक याची देही याची डोळा टिपायचे अन् टाळ्या वाजवून जयघोषही करायचे़ १२ पालख्यांचा भेट सोहळा झाल्यानंतर सर्व पालख्यांची एकत्रित गावातून मिरवणूक काढण्यात आली़ त्यानंतर श्री प्रभूलिंग मंदिरात सर्व पालख्या विसावल्या.
तत्पूर्वी सकाळी ७ वाजता मानाच्या काठ्या व नंदीध्वजाचे वेशीत आगमन झाले़ त्यानंतर वडापूर व मिरी या दोन्ही पालख्या, काठी व नंदीध्वजासह गावास नगरप्रदक्षिणा पूर्ण केली़ नंतर दुपारी मंदिरात विसावली़ या ठिकाणी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़
नोकरदार, व्यावसायिक परतले गावी- वडापूर गावातील बहुसंख्य लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत; मात्र या १२ गावच्या पालखी भेट सोहळ्यानिमित्त ते गावी परतले होते़ शिवाय यात्रेत सर्वजण स्वयंसेवक म्हणून आलेल्या भाविकांच्या सेवेत सज्ज झालेले दिसत होते़