रेवणसिद्ध जवळेकर।
सोलापूर : शहराच्या पंचक्रोशीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या पायी यात्रा परिक्रमेचा मार्ग भक्तगणांसाठी थोडा खडतरच राहणार आहे. स्मार्ट सोलापूरमध्ये बहुतांश ठिकाणी चकचकीत रस्ते झाले; मात्र काही ठिकाणी खड्डे, मार्गावरील बारीक खडी यामुळे नंदीध्वजधारकांसह भक्तगणांना थोड्या फार कसरतीचा सामना करावा लागणार आहे.
यंदा १३ जानेवारी रोजी तैलाभिषेक (यण्णीमज्जन) तर १४ जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर प्रमुख अक्षता सोहळा पार पडणार आहे. या दोन्ही सोहळ्यानिमित्त मानाचे सातही नंदीध्वज मिरवणुकीने पंचक्रोशीतील ६८ लिंगांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात. ‘लोकमत’ चमूने मिरवणूक मार्गांची पाहणी केली असता ८० ते ८५ टक्के रस्ते चकचकीत दिसून आले. उर्वरित १५ टक्के रस्त्यांची डागडुजी मनपाला करावी लागणार आहे. शिवाय काही रस्त्यांवर बारीक खडी पडली असून, अनवाणी जाणाºया भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
श्री सिद्धरामेश्वर मंदिरातील अमृतलिंगापासून ६८ लिंग पायी यात्रा परिक्रमेचा प्रारंभ होतो. तेथून होम मैदान, डफरिन चौक, महापौर बंगला, रेल्वे स्टेशन, शनि मंदिर, भैय्या चौक, जुनी मिल कंपाऊंड, कल्पना टॉकिज, धरमसी लाईन, झंवर मळा, जय मल्हार चौक, देशमुख गणपती, सम्राट चौक, बाळीवेस, टेलिफोन भवन, मीठ गल्ली, साखरे वाडा, सराफ कट्टा, मधला मारुती, माणिक चौक, शुक्रवार पेठ, विजापूर वेस, गुरुभेट, होम मैदान, पार्क स्टेडियम, लकी चौक, भागवत थिएटर, काळी मस्जिदमार्गे श्री मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत ही मिरवणूक निघते.
या मार्गांवर डागडुजी होण्याची गरज...- विजापूर वेस, मार्कंडेय मंदिर, पंच कट्टा आणि पुढे श्री सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या मार्गावर खड्डे पडलेले आहेत. मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय ते साखरे वाड्यापर्यंतच्या रस्त्यावरही हेच चित्र दिसते. महापालिकेने यात्रेच्या आधी रस्त्यांची डागडुजी करण्याबरोबरच रस्त्यावर बारीक खडी राहणार नाही, याबाबतची कामे हाती घ्यावीत, अशी मागणीही भक्तगणांनी केली आहे.
बालविकास ते डफरीन चौकापर्यंत रस्ता खोदून ठेवला- होम मैदानापासून पुढे बालविकास मंदिर ते डफरीन चौकापर्यंत स्मार्ट सिटीच्या कामामुळे रस्ता खोदून ठेवला आहे. शिवाय लगत काही खड्डेही पडलेले आहेत. यात्रा सुरु होण्याआधी किमान खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करावेत, अशी अपेक्षा भक्तगणांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
तैलाभिषेक, अक्षता सोहळ्याच्या निमित्ताने नंदीध्वज मिरवणुकीने भक्तगण ६८ लिंगांची पायी यात्रा करतात. यात्रेत सहभागी अनवाणी असलेल्या भक्तगण, नंदीध्वजधाºयांचा विचार करुन महापालिकेने रस्ते चकचकीत केल्यास त्यांच्या हातून श्री सिद्धरामेश्वरांची सेवा तरी घडेल.-परमेश्वर माळगेशहराध्यक्ष- श्रीराम सेना, सोलापूर.
मी तैलाभिषेक दिवशी ६८ लिंगांची पायी यात्रा करतो. अडगळीच्या ठिकाणी असलेल्या ६८ लिंगांपर्यंतच्या मार्गावर असलेली बारीक खडी हटविण्याचे काम महापालिकेने करावी. जेणेकरुन अनवाणी यात्रा करणाºया भाविकांना दिलासा मिळेल.-नितीन घटोळे,सिद्धेश्वर भक्त.