सोलापूर : शहरातील मध्यवर्ती भागातील नाट्यगृह हुतात्मा स्मृती मंदिर हे कलावंतांचे जिव्हाळ्याचे स्थान आहे. या नाट्यगृहाचे सुशोभीकरण लोकसहभागातून करण्यात येत आहे. नाट्यगृहाच्या भिंतीवर कलावंतांची चित्रे रंगविण्यात सध्या स्थानिक चित्रकार दंग आहेत.
महापालिकेकडून परवानगी घेऊन स्थानिक हौशी कलाकार हे श्रमदानातून परिसर अधिक चांगला करीत आहेत. मुंबईतील यशवंत नाट्यमंदिराप्रमाणे सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर सुशोभित करण्यात येत आहे. यासाठी यशवंत नाट्यमंदिराप्रमाणेच इतर नाट्यगृहांच्या रचना व तेथील सुशोभीकरणाचा अभ्यास करण्यात आला. नाट्यगृहाच्या बाहेरील परिसरात हे काम होत असून, रसिकांना नाट्यगृह आकर्षित वाटावे या दृष्टीने काम करण्यात येत आहे. सध्या कलावंतांची सुंदर चित्रे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही दिवसांत हुतात्मा स्मृती मंदिराचे रूप पालटलेले पाहायला मिळेल.
भिंतींवर बालगंधर्व, राम गणेश गडकरी, तेंडुलकर, निळू फुले, काशिनाथ घाणेकर, यशवंत दत्त यांसह अनेक कलावंतांची चित्रे रेखाटण्याचे काम सुरू आहे. एका कलावंताचा चेहरा साकारण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतात. अतिशय कोरीवपणे हे काम करण्यात येत आहे. चित्र काढण्याआधी नाट्यगृहाची भिंत, पार्किंगमध्ये असलेल्या खांबांवरील जाहिराती काढून ती जागा स्वच्छ करण्यात आली आहे. उन्हातही रंग टिकावा यासाठी विशिष्ट प्रकारच्या रसायनाचा या भिंतीवर वापर करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्यक्ष कर्तृत्ववान कलाकारांची चित्रे काढण्यास सुरुवात झाली आहे. भिंतीवर जुन्या प्रसिद्ध नाटकांची नावे लिहिण्यात येणार आहेत.
हुतात्मा स्मृतिमंदिराच्या सजावटीचे काम ४० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, येत्या महिन्याभरात हे काम पूर्णपणे होईल. त्यानंतर हुतात्मा स्मृती मंदिर अधिक आकर्षक दिसेल. यासाठी स्थानिक कलाकार लोकसहभागातून परिश्रम घेत आहेत.
- आनंद खरबस, सदस्य, अखिल भारतीय नाट्य परिषद, महाराष्ट्र