पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची झीज रोखण्यासाठी वज्रलेप प्रक्रिया आवश्यक असते़ यापूर्वी तीन वेळा असा वज्रलेप करण्यात आला होता. आता पाच वर्षांनंतर पुन्हा वज्रलेपाचा निर्णय मंदिर समिती बैठकीत घेण्यात आल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले यांनी सांगितले़सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रोज हजारो भाविक येतात़ प्रत्येक भाविक चरणस्पर्श करूनच विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेत असतो़ त्यामुळे साहजिकच मूर्तीची झीज होण्याची शक्यता असते़ ती रोखण्यासाठी समितीने वज्रलेपाचा निर्णय घेतला आहे.वज्रलेप करण्यासाठी पुणे येथील डेक्कन महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ त्यानुसार त्यांचे पथक मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करतील़ त्यानंतर वज्रलेपाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही डॉ़ भोसले यांनी सांगितले़
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीस लवकरच वज्रलेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:44 AM