पंढरपूर : सध्या उष्णतेची दाहकता वाढत असून ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने ही सेवा ७ जूनपर्यंत चालणार आहे. चंदनउटी पूजेसाठी आतापर्यंत श्री विठ्ठलाकडे ९५ तर रुक्मिणीमातेकडे ११ असे एकूण १०६ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवसाचे औचित्य साधून श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेस अलंकार व पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आला होता. मराठी नववर्षाचे स्वागत करीत असतानाच मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ त्यात उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी शीतल, थंड अशा चंदनाचा लेप देवाच्या अंगाला लावला जातो़ ही पूजा करताना ११०० ते १२०० ग्रॅम चंदनाचा वापर करण्यात येतो़ रोज सायं ४़३० ते ५़३० या तासाभरात दोन पूजा होतील़ यंदा श्री विठ्ठलाकडे ९५ तर रुक्मिणीमातेकडे ११ चंदनउटी पूजेसाठीचे अर्ज प्राप्त झाले आहेत़ श्री विठ्ठलाकडील पूजेसाठी २१ हजार रुपये तर रुक्मिणीमातेकडील पूजेसाठी ११ हजार रुपये इतके देणगीशुल्क निश्चित करण्यात आलेले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत श्री विठ्ठलाकडे सहा तर रुक्मिणीमातेकडे साडेतीन हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे़ यंदा चैत्र यात्रा १६ एप्रिल रोजी असल्याने राज्यभरातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. यात्रा कालावधीत चंदनउटी पूजेच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
पूजा करणाºया कुटुंबास मिळणार प्रसाद- चंदनउटी पूजा करणाºया कुटुंबीयांना मंदिर समितीच्या वतीने पाच प्रकारची प्रत्येकी सहा फळे, पेढा, बर्फी, शिरा, पोहे, सरबत असा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. एका चंदनउटी पूजेस कुटुंबातील १० सदस्य सहभागी होऊ शकतील़ - यंदा रोज दोन चंदनउटी पूजा घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले़