पंढरपूर (जि़सोलापूर) : पंढरीतील श्री विठ्ठल मंदिरात फुलांचा मंडप सजला... हजारो वराडी जमले...अन अक्षदा पडल्या...विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा पार पडला... अन् लगीन देवाच लागलं. वसंतपंचमीचं औचित्य साधून गुरुवारी मोठ्या जल्लोषात विठ्ठल-रखुमाईचा विवाहसोहळा पार पडला. अवघ्या पंढरीला या निमित्ताने आनंदला भरते आल्याचे चित्र दिसून आले.
या सोहळ्यानिमित्त गेल्या पाच दिवसात मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. विवाह सोहळ्यासाठी मंदिरात गावोगावच्या भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता ह.भ.प. अनुराधा शेटे यांनी रूक्मिणी स्वयंवरांची कथा सभामंडपात सुरू केली. याचदरम्यान विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये मानाचा गुलाल नेण्यात आला. हा गुलाल श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर उधळण्यात आला.यानंतर मुख्य विवाहसोहळयाला सुरूवात झाली. मूर्तीच्या कपाळी मंडवळया देखील बांधण्यात आल्या. दोन्ही देवतांच्या मधोमधे आंतरपाठ धरण्यात आला. शुभमंगल सावधान जयघोष झाला. हजारो भक्तांनी अक्षता टाकल्या आणि विठठल-रखुमाईचे लग्न लागले.महिनाभर देवाला पांढरे वस्त्रश्री विठ्ठलावर वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत रोज गुलाल आणि केशर पाणी टाकले जाते. तसेच या महिन्याभराच्या कालावधी मध्ये देवाला रोज पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले जातात.