पंढरपूर : गर्दी होऊन कोरोना विषाणूंचा पादुर्भाव वाढू नये, यासाठी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर बंद करण्यात आले आहे. यामुळे विठ्ठलाच्या दर्शनास कोणी येणार नाही, मंदिरात केलेली सजावट कोणी पाहणार नाही. हे माहित असताना देखील कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्वखर्चातून मोठ्या श्रद्धेने गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सोनचाफा फुलांची सजावट केली आहे.
मागील तीन वर्षापासून विविध उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची व फळांची आकर्षक सजावट करण्यात येते. परंतु १७ मार्चपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन बंद करण्यात आले आहे. यामुळे पंढरपुरात भाविक येणे बंद झाले आहेत.
परिणामी गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केलेली सजावट कोणाला पाहता येणार नाही. यामुळे सजावटीसाठी कोणी दाता तयार नव्हता. परंतु विठ्ठलावरील श्रद्धेपोटी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी स्वखर्चातून सोनचाफ्याची सजावट करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी खाजगी वाहनाने विरार मुंबई येथून पिवळा सोन चांफाची १५० किलो फुले मागविली आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास चाफ्याच्या फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच विठ्ठलाला सोवळे, उपरणे, अंगी व रुक्मिणी मातेला साडी, खण असा पोशाख परिधान करण्यात आला आहे.
चंदन उटी पूजा सुरू, पाडव्यानिमित्त
दोन वेळा काकडा आरती
पांडुरंगाची पहाटे ४ ते साडे पाच नित्यपुजा झाली आहे. पांडुरंगाची नित्य पूजेला काकड आरतीने सुरुवात झाली. पाडव्यानिमित्त दोन वेळा काकड आरती झाली आहे. सध्या उन्हाळा वाढत असल्याने उद्यापासून विठ्ठलाला दाखवण्यात येणाऱ्या पंचपक्वानाचा मध्ये बासुंदी हा उष्ण पदार्थ बंद करून श्रीखंड हा थंड पदार्थ देण्यात येणार आहे. तसेच उद्यापासून चंदन उठी पूजा सुरू करण्यात येणार आहे. ही चंदन उठी पूजा चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र पर्यंत होणार आहे.
मंदिरावर फडकला भागवत धर्माची पताका
विठ्ठल मंदिरात ध्वज पूजा करण्यात येणार आहे. भागवत धर्माची पताका लावण्याची परंपरा आहे. या मध्ये मुख्य ध्वज स्तंभ व रुक्मिणी मातेचे गोफुर व महाद्वार याठिकाणी ध्वज लावण्यात येतो. सकाळी नऊ च्या सुमारास ध्वज पूजा करण्यात आले.