सोलापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. वारकरी भाविकांना विठ्ठल मंदिराचे ७०० वर्षांपूर्वीचे सुंदर रूप पहावयास मिळणार आहे. गरुड खांबही चांदीने चमकणार असल्याचे मंदिरस समितीकडून सांगण्यात आले.
श्री विठ्ठल मंदिर व रुक्मिणी मंदिर गाभारा संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन कामास सुरुवात करण्यात आली आहे. हे काम पूर्णत्वास येत असून संवर्धनाचे काम दर्जेदार होऊन पुढील अनेक वर्ष टिकेल यादृष्टीने करण्यात आले आहे.
श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, सर्व सदस्य, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने वास्तु विशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार येवले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केली व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. मंदिरातील देवाचे गर्भगृह चौखांबी आणि सुळखांबी आता सातशे वर्षांपूर्वी च्या मूळ रूपात येऊ लागली आहेत. गर्भगृहात मूळ रूपातील गाभाऱ्यात देवाचे सावळे रूप खुलून दिसत आहे. दगडांनाही पॉलिश काम सुरू आहे. मंदिराचे संवर्धन व जीर्णोद्धारची कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. मंदिरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले गरुडखांब यास अलिंगन दिल्यशिवाय वारकरी तृप्तच होत नाही. गरुड खांबास चांदीचा पत्रा लावू नये असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. कारण या खांबास चांदीचा पत्रा लावल्यास दगडांना श्वास मिळणार नाही दगड खराब होतो. गरुड खांबास कुठल्याही परिस्थितीत चांदी लावावीच लागणार आहे. -ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य, विठ्ठल मंदिर समिती