सचिन कांबळे
पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये पावणे तीनशेच्या आसपास कर्मचारी काम करतात. कोरोनामुळे यापैकी २७ कर्मचारी सध्या कामावर असून उर्वरित कर्मचाºयांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिकारी मात्र रोज नित्यनियमाने कामावर येतात. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी, महिन्याला सव्वा कोटी रूपयांचा खर्च सुरू असल्याचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
कोरोना संसर्गजन्य रोगामुळे १७ मार्चपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. असे असले तरी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात देवाचे नित्योपचार केले जातात. मंदिर समितीकडून शहरातील बेघर, भिक्षाकरी लोकांना अन्नदान केले जात आहे. यामुळे मंदिरात पुजारी व सुरक्षा कर्मचारी असे फक्त २७ कर्मचारी कामावर येतात. हे काम व्यवस्थितरित्या पार पडते का नाही याची पाहणी करण्यासाठी मंदिरात रोज कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड येतात. मंदिर बंद असल्यामुळे भाविकांकडून देणगी मिळत नाही. त्यामुळे मंदिर समितीचे उत्पन्न बंद झाले आहे. मात्र, मंदिरात काम करणाºया २३७ कर्मचाºयांना मंदिर समितीला महिन्याला ३७ लाख रुपयांचा खर्च करावा लागतो.
त्याचबरोबर रोज दीड हजार लोकांना दोनवेळा जेवण द्यावे लागत आहे. याचादेखील खर्च रोज अंदाजे २५ हजारांच्या आसपास आहे. त्याचबरोबर शहराच्या सुरक्षेसाठी मंदिर समितीने खासगी कमांडो देखील पोलीस प्रशासनाला मदतीसाठी दिले आहेत. याचादेखील वेतनाचा भार पडत आहे. यामुळे मंदिर समितीला अंदाजे महिन्याला सव्वा कोटीच्या आसपास खर्च आहे मात्र उत्पन्न सध्या शून्य आहे.
आॅनलाईन देणगी द्यावी- विठ्ठल मंदिरात भाविकांची आवक नाही. यामुळे मंदिर समितीला देणगी, फोटो व लाडू विक्री, पूजा अन्य विविध मार्गाने मिळणारे उत्पन्न बंद झाले आहे. मात्र, महिन्याला सव्वा कोटीच्या आसपास खर्च मंदिर समितीला करावे लागत आहेत. यामुळे इच्छुक भाविकांनी मंदिर समितीला आॅनलाईन देणगी द्यावी, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केले.
महाराष्टÑातील इतर देवस्थानपेक्षा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी अधिक भाविक येतात. मात्र देवस्थानच्या तुलनेने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला उत्पन्न कमी असते. मंदिर बंद झाल्यापासून मंदिराच्या पेटीमध्ये एकही पैसा आला नाही. परंतु आॅनलाईनच्या माध्यमातून मंदिर समितीला १ लाख ८० हजार रुपये देणगी मिळाली आहे. लॉकडाऊनच्या आदी मंदिराच्या विकासासाठी भाविकांनी दान म्हणून जे पैसे दिले होते. त्याच पैशांतून मुख्यमंत्री साहाय्यता निधी, बेघर लोकांना अन्नदान, जनावरांना चारा, डॉक्टरांना मेडिकल किट्स व अन्य प्रकारे मदत करत आहोत.- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकरसहअध्यक्ष, मंदिर समिती, पंढरपूर