- सचिन जवळकोटेसोलापूर - पंढरीचा विठुराया म्हणे युगानुयुगे एकाच ठिकाणी उभारला. वीट सोडून कधी खाली उतरला नाही. जागा सोडून कधी हलला नाही; मात्र कलियुगात नव्या परंपरेची चाहूल लागली. उत्पातांनी रुक्मिणी मातेचं स्वतंत्र मंदिर उभारल्यानंतर आता बडव्यांनीही विठ्ठलासाठी पुढाकार घेतला. खऱ्या मंदिराचा ताबा गेल्यामुळं स्वत:च्या जागेत नव्या मूर्तीची स्थापना जाहली.न्यायालयीन लढाईनंतर पंढरपूरच्या बडवे-उत्पात समाजाला विठ्ठल मंदिरावरचा ताबा गमवावा लागला होता. मंदिरात शासनाने पगारी पुजारी नेमले. तेव्हापासून हा समाज अस्वस्थ होता; मात्र गेल्यावर्षी घटस्थापनेला उत्पातांनी वसिष्ठ आश्रम परिसरात रुक्मिणीचे छोटेखानी मंदिर बनविले. त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला. ‘प्रति रुक्मिणी मंदिर बनविणारे हे उत्पात कोण?’ असा संतप्त सवालही पुरोगामी मंडळींनी विचारला. या पार्श्वभूमीवर काळा मारुतीजवळ बाबासाहेब बडवे यांनी शुक्रवारी विठ्ठलाच्या नव्या मूर्तीची स्थापना केली. पंढरपुरातीलच एका मूर्तीकाराकडून सुमारे साडेतीन फुटाची सुबक मूर्ती बनवून घेण्यात आली. शुक्रवारी मूर्तीला ख-या विठ्ठलासारखाच पेहराव करण्यात आला. गाभारा परिसरात फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली.मात्र, मंदिराला ‘प्रति विठ्ठल’ म्हणू नये, असे आवाहन खुद्द बडव्यांनीच केले आहे. ‘गुढीपाडव्यापासून शिमग्याच्या पौर्णिमेपर्यंत परंपरेनुसार घरातील कुलधर्म-कुळाचार करण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जात होतो; मात्र आता आम्ही नाईलाजानं स्वत:च्या घरातच नव्या विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केलीय;’ असं बाबासाहेबांचे पुतणे अॅड.आशुतोष बडवे यांनी ‘लोकमत’ला सांगितलं.‘हे आमचं खाजगी देवघर आहे. याला कुणीही प्रति विठ्ठल म्हणू नये,‘ असं म्हणणारे बडवे ‘ मात्र इतर भाविक मंडळी या ठिकाणी दर्शनाला आली तर आमची काहीच हरकत असणार नाही’, असेही सांगायला विसरले नाहीत.मंदिरे कैक; मात्र ‘नवा विठ्ठल’ पहिलाचपंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीची कैक छोटी-मोठी मंदिरे आहेत. अनेक बडवे-उत्पातांनी आपल्या घरातही या दोघांसाठी देवघर सजविलेला; मात्र विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर नव्या मूर्तीची स्थापना शुक्रवारी पहिल्यांदाच झाली.
विठ्ठल...विठ्ठल... पंढरपुरात नवा विठ्ठल! उत्पातांनंतर बडव्यांचाही पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 6:14 AM