लोकमत न्यूज नेटवर्क, पंढरपूर : विठ्ठल मंदिरातील विकास कामादरम्यान मूर्ती सुरक्षित राहावी यासाठी १५ मार्चपासून दीड महिना पांडुरंगाचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना दिवसभरात फक्त पाच तास मुखदर्शन घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली.
गर्भगृहातील ग्रॅनाइट काढणार
विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाइट फरशी काढण्यात येणार आहेत. विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यास १५ मार्चपासून हे काम सुरू होणार आहे. साधारण ४५ दिवसांचा जरी कालावधी लागत असला तरी ऐनवेळच्या अडचणी लक्षात घेता ५ जूनपर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे. आता भाविकांना ३० फुटांवरून मुखदर्शन मिळेल. चैत्री यात्रा कालावधीत पूर्ण वेळ मुखदर्शन मिळेल.
विठोबाला बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण : विठ्ठलाच्या मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. काचेचे दोन कवच राहणार असून, त्यात एका काचेत कॅमेरा राहणार असल्याचे समितीचे सहायक अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.