कुर्डूवाडी : शेतीसाठी लागणारी रासायनिक खते, पीव्हीसी पाइप्स, तण नाशके, कीटकनाशके, ठिबक सिंचन तसेच शेती उपयुक्त औजारांची विक्री सभासदांना विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्युसर या शेतकरी उत्पादक संस्थेच्या माध्यमातून केली जाणार आहे. सभासद शेतकऱ्यांना औषधे व खतांचा पुरवठा ना नफा ना तोटा तत्वावर स्वस्त दरात देणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष धनराज शिंदे यांनी सांगितले.
माढा तालुक्यात उजनी धरणावरील विविध सिंचन योजना, सीना-माढा जोड कालवा असल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ झालेली आहे. उसाच्या क्षेत्राबरोबरच फळबागा व भाजीपाल्याचे क्षेत्रही वाढत आहे. शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्युसर या शेतकरी उत्पादक संस्थेची स्थापना केली असून, या संस्थेमार्फत शेतकरीवर्गाने उत्पादित केलेल्या शेतमालाची विक्री थेट परदेशातील ग्राहकांना केली जाणार आहे. खते व औषधे पुरवठ्यात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच शेतकऱ्यांना गरज असेल तेच खत व औषधे मिळणार आहेत. याकरिता कंपनीने विक्रीबाबत काही नियम ठेवले आहेत. कंपनीने सभासदांसाठी किसानकार्ड दिले असून, त्या कार्डवर शेतकऱ्यांची जमिनीची नोंद, माती पाणी परीक्षणांची नोंद, पिकाच्या लागवडीची नोंद असणार आहे. सभासदाच्या सोयीकरिता तालुक्यात इतर पाच ठिकाणी याची उपकेंद्रे स्थापन केली जाणार आहेत. (वा. प्र.)
---
फोटो : १४ धनराज शिंदे