टेंभुर्णी : नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपासून संचालक असलेल्या १० संचालकांच्या नेतृत्वखालील पॅनेलला जनतेने नाकारले असून, दोन संचालकांना स्वतः पराभवास सामोरे जावे लागले आहे, तर दोन संचालकांच्या नेतृत्वाखालील गटास एकही जागा जिंकता आली नाही. दोन गावातील संचालकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
सापटणे (टे) येथे संचालक बाळासाहेब ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला एकही जागा जिंकता आली नाही. येथे माजी उपसभापती बंडूनाना ढवळे यांच्या गटाने सर्व जागा जिंकून सत्ता हस्तगत केली, तर कुंभोज येथेही संचालिका सिंधुताई नागटिळक यांचे पती सुभाष नागटिळक यांच्या गटास एकही जागा जिंकता आली नाही. येथे मदन आलदर गटाने सर्व जागा जिंकल्या. उपळाई बुद्रुक येथे संचालक सीताराम गायकवाड यांच्या गटास दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. येथे माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत देशमुख यांच्या गटाने सर्व १५ जागा जिंकून सत्ता काबीज केली.
टाकळी येथील संचालक हिम्मत सोलंकर यांच्या गटास एका जागेवर विजय मिळाला. येथे तानाजी सलगर यांच्या गटाने आठ जागा जिंकून सत्ता खेचून आणली. बेंबळे येथे संचालक विष्णू हुंबे ज्या सिद्धेश्वर ग्राम विकास आघाडीमधून उभा राहिले त्या पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले; परंतु विष्णू हुंबे यांचा पराभव झाला. मोडनिंबमध्ये संचालिका नंदाताई सुर्वे यांचाही पराभव झाला. रांजणीत संचालक वेताळ जाधव यांच्या गटाचा पराभव झाला. येथे माजी कृषी सभापती संजय पाटील भीमानगरकर यांच्या गटाने ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता आपल्याकडे ठेवली.
मानेगावात संचालक नीळकंठ पाटील व उंदरगाव येथे संचालक अमोल चव्हाण गटाचा निसटता पराभव झाला. घोटी येथे संचालक पोपट चव्हाण गटाचा, तर रिधोरे येथे पोपट गायकवाड गटाचा पराभव झाला. येथे रयत क्रांती संघटनेने सत्ता हस्तगत केली.
बारलोणीत बागलांनी सत्ता कायम राखली
बारलोणी येथे मात्र संचालक सुरेश बागल यांनी सर्वच्या सर्व ११ जागा जिंकून सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. पंचायत समितीचे सदस्य व्यंकटेशनाना पाटील गटाचा दारुण पराभव केला. अकोले (खुर्द) येथे स्वर्गीय संचालक बबनबापू पाटील यांच्या गटाने ११ पैकी ८ जागा जिंकून सत्ता कायम राखली. मात्र, बबनबापू पाटील यांचा मुलगा गोटू पाटील यांचा धक्कादायक पराभव झाला.
----------स