सोलापूर : तृतीयपंथियांना समाजात वावरण्यासाठी शासन सर्व सोयी-सुविधा देत आहे. त्यांच्या विकासासाठी विविध शासकीय योजना आणल्या आहेत. यामुळे तृतीयपंथियांनी आजारापणात, वृद्धापकाळात उपयोगी पडण्यासाठी पैशांच्या बचतीची सवय लावून घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी आज केले.
रंगभवन येथे जिल्हा निवडणूक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा एडस नियंत्रण कार्यालय, महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी आणि निरामय आरोग्यधाम संस्थेच्या वतीने आयोजित तृतीयपंथीय आणि वंचित महिलांच्या स्नेहमेळावा, विविध दाखले वाटप कार्यक्रमात श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी, तहसीलदार अमरदीप वाकडे, निरामयच्या प्रकल्प संचालिका सीमा किणीकर, ॲड. लक्ष्मण मारडकर, एडस सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी नागेश गंजी, विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक मल्लिनाथ शहाबादे, दोस्ताना संघटनेचे आयुब सय्यद, सौंदर्या उपस्थित होते.
वाघमारे यांनी सांगितले की, नागरिकांनी तृतीयपंथियाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. तेही एक व्यक्ती आहेत, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. तृतीयपंथियांनी उत्पन्नाचा दाखला, मतदान कार्ड, ओळखपत्र, रेशनकार्ड याबाबत पाठपुरावा करावा. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सतत पाठपुरावा केल्याने केवळ स्वयंघोषणापत्र दिल्यास तृतीयपंथीय असल्याचे युनिक ओळखपत्र मिळत आहे. जिल्ह्यात २१५ तृतीयपंथियांना मतदान कार्ड देण्यात आले आहे. उर्वरित तृतीयपंथियांनाही शिबीराद्वारे दाखले दिले जातील. कोणत्याही बाबतीत त्यांना वंचित ठेवले जाणार नाही, मात्र त्यांनी पुढे येऊन माहिती घ्यावी. त्यांच्या घराच्या भूखंडासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.