कुर्डूवाडी : बारलोणी गावात निवडणुकीपूर्वी पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामुळे गावात पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आला आहे. तेथे दिवसभर अगदी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. माढा तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया पार पडली असून, आता साऱ्यांचे लक्ष सोमवारच्या निकालाकडे लागले आहे. जो तो आपली पार्टी बसणार म्हणत चहा पाजत एकमेकांचे तोंड गोड करताना पाहायला मिळाले.
माढा तालुक्यात ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले. निमगाव (टें), महातपूर, सापटणे (भो), जामगाव, वडाचीवाडी (त.म), खैराव, फुटजवळगाव, धानोरे या आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ७४ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया शुक्रवारी शांततेत पार पडली. सायंकाळी चारच्या दरम्यान ७० टक्के मतदान झाले होते.
अनेक गावांत दोन गटांत चुरशीची लढत पाहायला मिळावी. त्याचा प्रत्यय मतदानाचा हक्क बजावताना मतदारांतून दिसून आला. कुर्डू, लऊळ, बारलोणी, मोडनिंब, ढवळस, रांजणी, अरण, बावी, भुताष्टे, उपळाई (बु), उपळाई (खु) सारख्या मोठ्या गावांत मतदारांतून आपापल्या गटाला मतदान करण्यासाठी चुरस निर्माण झाली होती. यंदा अनेक गावांतून तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला.