या उपक्रमाची कल्पना सोलापूरचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांना शिक्षिका शिवगुंडे यांनी दिली. प्रत्येक तालुक्यातील काही शिक्षकांना एकत्रित करून ‘वृक्षमित्र साखळी ग्रुप’ तयार करण्यात आला. ९ मे ते ५ जून अशा चार आठवड्यांच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली, त्यात पहिल्या आठवड्यात प्रत्येक शिक्षकांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाबाबत आपापल्या शाळास्तरावर राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची ओळख करून दिली. सुटीत मुलांनी याचा सदुपयोग करीत १५०० हून अधिक रोपे तयार केली. या उपक्रमात माढा, सांगोला, बार्शी, माळशिरस, उत्तर सोलापूर, मंगळवेढा तालुक्यातील शिक्षकांनी सहभाग नोंदवून काम केले. शिक्षणाधिकारी राठोड व उपशिक्षणाधिकारी मोरे यांनी याचे कौतुक करीत सर्वांना विशेष प्रोत्साहन दिले.
----
मान्यवरांचा रोपे देऊन सत्कार
जागतिक पर्यावरण दिवस येत असल्याने औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी, शिक्षक, विविध क्षेत्रातील कर्मचारी, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा शिक्षकांनी तयार केलेली रोपे देऊन सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना वृक्षमित्र साखळी उपक्रमाची कल्पना दिली असता, क्षणाचा विलंब न करता त्यांनी उपक्रमाचे विशेष कौतुकही केले.
-----
शिक्षकांनी आपापल्या तालुक्यातील विद्यार्थी, पालक, शिक्षकांना वृक्षारोपण सारख्या विषयातून कठीण काळात आवडीच्या कार्यात रमून स्वतःची इम्युनिटी कशी वाढवावी याचे प्रात्यक्षिक दाखविले. एकमेकांच्या कार्याचा गौरव करीत एकमेकांचे मनोबल वाढविले. हीच आहे नैसर्गिक ऑक्सिजन निर्मिती.
- सुप्रिया शिवगुंडे, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, शिंदेवस्ती (पिरळे)
---