वागदरी परिसरावर बरीच वर्षे दिवंगत आमदार बाबासाहेब तानवडे यांचे वर्चस्व होते. या गावच्या निवडणुकीकडे नेहमी तालुक्याचे लक्ष लागलेले असते. मागील तीन टर्मपासून श्रीशैल ठोंबरे हे एकहाती सत्ता मिळविण्यासाठी मातब्बरांविरुद्ध झुंज देत आहेत. यावेळीसुद्धा त्याच ताकदीने ते लढत देत असून यंदा काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या ठोंबरे, पोमाजी विरुद्ध वरनाळे, पोमाजी, ढोपरे यांच्या पॅनेलमध्ये दुरंगी लढत होत आहे. हे गाव माजी आमदार सिद्रमप्पा पाटील यांच्या पै-पाहुण्यांचे म्हणून परिचित आहे. यंदा जाहीर सभा, बैठका घेण्यास बंदी असल्याने स्वतंत्र गाटीभेटींवर भर आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांचे चिन्ह पोहोचवण्याचे काम तरुण पिढी करीत आहे.
पै-पाहुण्यांच्या लढतीची पंचक्रोशीत चर्चा
प्रभाग ४ मध्ये सुजाता पोमाजी विरुद्ध गंगाबाई पोमाजी या सासू विरुद्ध सुनेची लढत अत्यंत चुरशीने होत आहे. सोमनाथ सुतार विरुद्ध पंकज सुतार या काका-पुतण्यामधील लढतीची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. तसेच श्रीकांत भैरामडगी विरुद्ध संतोष पोमाजी या पाहुण्या-रावळ्यांच्या लढतीसुद्धा काही कमी नाहीत. श्रीशैल ठोंबरे यांच्या विरुद्ध विजयकुमार ढोपरे या दीर्घकालीन मित्रांच्या पॅनलमध्ये कडवी झुंज सुरू आहे. एकंदरीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अशा प्रकारच्या लढतीमुळे गावात रोज चवीने चर्चा होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईक, पाहुणे असल्याने मतदानासाठी निर्णय घेताना अनेकांची दमछाक होत आहे. माजी झेडपी सदस्य सिंधुताई सोनकवडे, विजयकुमार ढोपर हेही या निवडणुकीत आपली ताकद अजमावत आहेत.
स्थलांतरित मतदारांवर उमेदवारांची भिस्त
वागदरीत एकूण मतदार पाच हजार ६०३ मतदार असून पैकी तीन हजार २० पुरुष, तर दोन हजार ५८३ महिला मतदार आहेत. यामध्ये एक हजार ५०० मतदार बाहेरगावी म्हणजेच स्थलांतरित झालेले आहेत. यांच्यावर गावच्या निवडणुकीच्या निकालाची भिस्त आहे. या मतदारांना काबीज करण्यासाठी प्रत्येकजण झटत आहेत. कोरोनाकाळात आपल्याला गावाकडे येऊ दिले नाही, याची खंत या स्थलांतरित मतदारांना आहे. ते आता उमेदवारांना तसे बोलून दाखवीत आहेत.