माळशिरस : पळसमंडळ येथील साळवे कुटुंबातील शेतकऱ्यांनी आपण मागत असलेल्या कागदपत्रांची टाळाटाळ होत आहे. ती कागदपत्रे देण्यासाठी नाहक त्रास होत असल्याच्या कारणास्तव भूमी अभिलेख कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. याबाबत कार्यालयाने शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिले.
मात्र ते पत्र जाणीवपूर्वक उशीर करत कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर दिल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संबंधित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
शेतीच्या विविध कामांसाठी आवश्यक असणारे नकाशे, उतारे मिळवण्यासाठी अनेक शेतकरी वारंवार कार्यालयात खेटे घालताना दिसत आहेत. या त्रासाला कंटाळून साळवे कुटुंबातील शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता. ही कागदपत्रे आपणास ८ डिसेंबरपर्यंत मोजणी प्रत पुरविण्यात येईल. त्यामुळे आपण उपाेषणासारख्या मार्गापासून परावृत्त हाेऊन, उपोषण मागे घ्यावे अशा आशयाचे भूमी उपअधीक्षकांच्या सहीचे पत्र देण्यासाठी आम्हाला तब्बल आठ तास वेठीस धरण्यात आले. कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता पत्र दिले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मुद्दामहून उशिरा पत्र दिल्याने सदरच्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
भूमी अभिलेख कार्यालयांतील शेतकऱ्यांच्या कामातील विलंबाच्या तक्रारी वाढत आहेत. उपोषण करण्यापूर्वी हे पत्र का दिले नाही. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची माहिती मागवून आवश्यक ती कारवाई केली जाईल.
- राम सातपुते, आमदार, माळशिरस
----