कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यावर्षीही आषाढी यात्रा सोहळा मोजक्याच मानाच्या दहा पालख्या व प्रमुख भाविकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून वाखरी पालखी तळ व पंढरपूरमध्ये नियोजन सुरू आहे. या मानाच्या पालख्या बसने वाखरी पालखी तळावर येणार असल्या तरी त्यानंतर वाखरी-पंढरपूर या पालखी मार्गावर पायी चालत जाणार आहेत. त्यामुळे नियोजन करीत असताना पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना या खड्ड्याबाबत प्रशासन अद्यापही उदासीन आहे.
वाखरी पालखी तळापासून हा पालखी मार्ग दुहेरी केला आहे. त्यामुळे पालख्या पंढरपूरकडे जाताना हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ण बंद करून पालख्या जाणार असल्या तरी पालखी तळ ते वाखरी ग्रामपंचायत या दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यानंतर वाखरी ओढ्यावरील पूल, पांडुरंग साखर कारखाना कार्यालयाशेजारी असलेल्या ओढ्याच्या बाजूच्या मार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. विसावा मंदिर, इसबावी बुवाचे हॉटेल, कर्मवीर कॉलेज चौक, सरगम चौकात टेंभुर्णी मार्गासह रेल्वे पुलाखाली या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवताना वाहनधारकांची कसरत होत आहे. पायी चालणाऱ्या भाविकांची अवस्था यापेक्षा वेगळी नसेल आशा भावना भाविकांमधून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
----
शहरातील खड्डे बुजविण्यास सुरुवात
यात्रा काळात शहरात संचारबंदी आहे. यात्रा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात होणार असला तरी एकादशीला होणारी पालख्यांची नगरप्रदक्षिणा, रथयात्रा, चंद्रभागा स्नान आदी पारंपरिक कार्यक्रम परंपरा नेहमीप्रमाणे होणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, सावरकर चौक, नगरपालिका मार्गावरील खड्डे बुजविण्यास नगरपालिकेने सुरुवात केली आहे. त्यामुळे किमान शहरात तरी वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
----
वाखरी-पंढरपूर पालखी मार्ग सरगम चौकापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली आहे. त्यामुळे मी स्वतः व प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी त्या विभागाला हे खड्डे भरून घेण्याच्या लेखी व तोंडी सूचना दिल्या आहेत. ते बुजविले नसतील तर त्यांना आणखी एकवेळी सांगून खड्डे बुजविण्याच्या सूचना केल्या जातील.
- अरविंद माळी
मुख्य कार्यकारी अधिकारी पंढरपूर
----
वाखरी पंढरपूर पालखी मार्गावर वाखरीजवळ असे मोठमोठे खड्डे पडले आहेत.