सोलापूर : अनेक कारणांमुळे आपली चालण्याची सवय मोडलीय. अन् आपणच आपलं आयुष्य अल्पायुषी करून बसलो आहोत. अकाली वृद्धत्व ओढावून बसलो आहोत. मात्र, हे मनापासून टाळायचं असेल, गुडघेदुखी, कंबरदुखी कायम घालवायची असेल अन् मधूमेह, हृदयविकार नॉर्मल ठेवायचं असेल तर मग दररोज दहा हजार पावले चाला, मग बघा हे आजार चुटकीसरशी पळून जातील आणि स्मार्टही दिसाल. हा सल्ला आरोग्य क्षेत्रातील जाणकरांची दिला आहे. अन् ज्यांना एवढं चालणं शक्य नाही त्यांनी आपल्या कुवतीनुसार जसं शक्य होईल तसं चाललंच पाहिज. हे मात्र खरं.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाहेर पडायचे असल्यास मोटारसायकलशिवाय आपण बाहेर पडत नाही. चालण्याची सवयच मोडली आहे. यामुळे आपसूकच अगदी तरुण वयामध्ये कंबरेच्या वेदना एक सामान्य समस्या झाली आहे. व्यायामाचा अभाव, आधुनिक जीवनशैली, कोणत्याही शारीरिक स्थितीमध्ये बसणे, एकाच जागी खूप वेळ बसून काम करणेसुद्धा याला कारणीभूत आहे.
जेवणाअगोदर व्यायाम करणे हे चांगले. जेवणानंतर कमीत कमी २ तासांनंतर व्यायाम करावा. मनाच्या एकाग्रतेसाठी, चिंतनासाठी चालणं गरजेचं आहे. वजन कमी करायचे असल्यास किंवा शरीरातील अतिरिक्त उष्णता जाळायचीअसेल तर रोज सकाळी किमान एक तास तरी वेगाने चाला. यामुळे वजनही कमी होईल. पचनक्रिया सुधारते. हृदयविकाराचा झटका येत नाही. यासाठी एका ठिकाणी एक तास बसू नये. पायांचे स्नायू चालण्यामुळे बळकटी येते. मधुमेह, रक्तदाब नियंत्रित राहतो. एवढे तर आपणास करावं लागेल.
----
एवढेच होते चालणे
- ज्येष्ठ मंडळी डॉक्टरांनी सल्ला दिला म्हणून दररोज सकाळी व्यायाम करतात. सांधेदुखी, कंबरदुखी, मणक्याचा त्रास, मधुमेह, रक्तदाब कमी व्हावी यासाठीच हे चालणे होते. बहुतांश गृहिणी, नोकरवर्ग संध्याकाळी व्यायाम करतात. काही मंडळी तर चालणेच हरवलेले दिसतात. अगदी किरणा दुकानापर्यंत किंवा रिक्षा स्टॉपवर जाईपर्यंत एवढेच काय ते यांचे चालणे होते. नोकरवर्ग ऑफिसला अथवा कुठेही बाइकशिवाय जात नाहीत. गाडी पार्क करून फार तर घरात अथवा कार्यालयात जाईपर्यंतच यांचे चालणे होते. मग अकाली व्याधी जडणारच.
----
अहो, म्हणून तर वाढले हे विकार
- गुडघेदुखी, मणक्याचे, पाठीचे आजार, रक्तदाब, मधुमेह, पोटदुखी, जाडी हे विकार चालणे बंद झाल्यामुळे जडले. चालण्यामुळे हाडाची घनता वाढते. आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यासाठी चालण्यासारखा उत्तम पर्याय जगात कुठे नाही. सुखी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर या गोष्टी आजपासूनच अमलात आणाव्यात, असा सल्ला अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुनील हंद्राळमठ यांनी दिला.
----
हे करून बघा
- दोन्ही हातांनी दोन्ही गुडघे पकडून छातीकडे ओढा. चार ते पाच सेकंद धरून ठेवा. नंतर गुडघे खाली घेऊन सावकाश श्वास घ्या. असे ५ वेळा करा.
-पाठीवर झोपा. पाय सरळ व गुडघे ताठ ठेवा. दोन्ही पायांमध्ये दोन इंचांचे अंतर ठेवा. पाय जमिनीपासून साधारणत: पाच इंच वर उचला आणि दहा सेकंद तरी धरून ठेवा. असे दहा वेळा करा.
- किमान एक किलोमीटर परिसरात जाताना मोटारसायकलचा वापर टाळायला शिका.
- ऑफिस, कार्यालयात चढ-उतार करताना लिफ्टचा वापर टाळा पायऱ्यांचा वापर करा. यामुळे आपल्या स्नायूंना व्यायाम होईल.
-----
चालणे शक्य अशांनी करावे काय?
- ज्यांचे गुडघे पायी चालण्यानंतर दुखतात अशांनी पोहणे आणि सायकलिंग करावी. यामुळे स्नायूंना शारीरिक हालचाली वाढायला हवे. आपल्या शरीराची लवचिकता राहते. किमान २० मिनिटे तरी सायकलिंग करावी. दीर्घायुष्यी जगण्यासाठी पायांच्या स्नायूंना बळकटी येते. यासाठी याचा अंमल करावा.
-----