बार्शी : हल्ली वाढदिवस साजरा करण्याचे नवनवे फंडे पाहायला मिळतात. आपल्या प्रियजनांचा वाढदिवस साजरा करुन त्यांच्याप्रती अभीष्टचिंतन करण्याचा हा प्रकार. यात काही गैरही नाही. बार्शी तालुक्यातील शेंद्रीच्या ग्रामस्थांनी मात्र चार-पाच वर्षांपासून लळा लागलेल्या फिरस्ती लालूनामक श्वानाची (कुत्रा) डीजेच्या तालावर सवाद्य मिरवणूक काढून, केक कापून अन् गावकºयांना जेवण भरवून जंगी वाढदिवस साजरा केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी पाचशेहून अधिक ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली.
चार-पाच वर्षांपूर्वी शेंद्री गावामध्ये लालूनामक श्वान गावात दारोदर फि रुन जे काही मिळेल त्यावर गुजराण करायचा. हळूहळू तो अगदी लहान-थोरांपासून सगळ्यांना लोकप्रिय झाला. अगदी लहान मुलांनी जरी त्याला हात लावला तरी तो चावायचा नाही. या कुत्र्याचा सर्वांना लळा लागला आहे. प्रत्येक जण त्याला लालू नावानं हाक मारायचा अन् तोही त्यांच्याकडे मान हलवून आदर करायचा. त्याच्या या अतीव प्रेमामुळे गावातील काही तरुण मंडळींनी ठरवलं आपण माणसांचा वाढदिवस साजरा करतो मग प्राणिमात्रांचा का करु नये? मग ठरलं अन् हा हा म्हणता लोकवर्गणी करुन या कुत्र्याचा वाढदिवस धूमधडाक्यात करण्याचे नियोजन आखले.
यासाठी फत्तेसिंह निंबाळकर, तानाजी निंबाळकर, संजय पाटील, विनोद शहा यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी गावातून २० हजार रुपये वर्गणी गोळा झाली. वाढदिवसाच्या निमित्ताने गावात डिजिटल फलक लावण्यात आले़ सोमवारी रात्री या लालूला हारतुरे घालून सजवण्यात आले. वाढदिवसाचा केक कापून डीजेच्या तालावर या कुत्र्याची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी लोणी, ता़ परंडा येथून डीजे आणण्यात आला़ यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली़ यानंतर गावकºयांतर्फे लहान मुले व ज्येष्ठांना भात-सांबरचे जेवणही देण्यात आले. शेंद्रीकरांनी साजरा केलेल्या या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची पंचक्रोशीत मात्र जोरदार चर्चा आहे. हा वाढदिवस पाहण्यासाठी भोर्इंजे, शेंद्री, लोणी आदी परिसरातील नागरिक आले होते.
मायेच्या भावनेतून राबविला उपक्रम- प्राणिमात्रांवर दया करा, असा संदेश आपल्या पूर्वजांपासून देण्यात आला आहे. तेच सूत्र लक्षात घेऊन आम्ही लालूचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आणि सबंध गावाच्या सहभागातून हा उपक्रम राबविला. माणसांप्रमाणेच पशु-पक्ष्यांवरही माया करावी या भावनेतून साºया गावाने हा आनंद सोहळा साजरा केल्याचे फत्तेसिंह निंबाळकर, तानाजी निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले.