निसर्गाने रुद्रावतार धारण केला, की संपूर्ण मानवजात आत्मसमर्पित होते, याचं मानवजातीच्या इतिहासातील उदाहरण म्हणजे कोरोना. एवढासा न दिसणारा विषाणू... त्यानं सारं जग हलवून सोडलं. प्रचंड उलथापालथ केलीय. तसं तर मानवानं अशा साथीच्या रोगाची अनेक संकट झेलली, पेलली, त्यावर मातही केली. महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने तर १८९६ च्या प्लेगसारख्या साथीला सक्षमतेनं तोंड दिलं. खंबीरपणा, संयम, लवचिकता हे महाराष्ट्राचे पारंपरिक आणि वारसाने मिळालेले गुण आहेत. यावेळी त्यात गांभीर्य हा गुण जोडायचा आहे. शासन, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अत्यंत सक्षमपणे, जीवावर उदार होऊन काम करत आहे. पण त्यांचे यश आपल्या विश्वासातून आणि साथ देण्यातून मिळणार असतं.
घर, फ्लॅट, बंगला असलेले आपापल्या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि यातलेच लोक कोणत्या ना कोणत्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. 'गर्दी ' करत आहेत. संपूर्ण देशात आणि जिल्ह्यातही अनेक घटकांच्या मीठ-भाकरीचा प्रश्न सोडविण्यात अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. आपल्याच देशाचे नागरिक असलेल्या भटक्या जमाती, मजूर, स्थलांतरित यांचे या लॉकडाऊनमध्ये कितीतरी प्रश्न आवासून उभे आहेत. लोक कुठे कुठे दूर अडकले आहेत. कितीतरी संकटं सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहेत.
कोरोनाच्या या एकच महिन्याच्या काळात मानसिक रुग्णांच्या संख्येत २० टक्के वाढ झालेली आहे. त्यांचेही प्रश्न ‘सार्क’, ‘अंनिस’ आणि ‘स्पा’सारख्या संस्था सोडवत आहेत. मग आता आपल्याला प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं आहे? संकट रोखण्याला. हे युद्ध मानवच जिंंकणार याला इतिहासाची साक्ष आहे. पण फक्त मानवता बाळगायला हवी आहे. कुणालाही कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी कळत- नकळत सुद्धा मी कारणीभूत होणार नाही ही ती मानवता होय. दुसरं म्हणजे जगात निर्माण झालेल्या प्रत्येक जंतूचा शेवट असतोच. कोरोनाचंही असंच होणार आहे. फक्त दोन महिने संयम बाळगायचाय आणि प्रशासन जे नियम आणतंय त्याला सक्ती न समजता काळजी समजायचंय.
स्व - प्रतिमेवर प्रेम करणाºया, सतत सेलिब्रेशन करणाºया लोकांना हा काळ स्वत:साठी खूप कठिण वाटत आहे. आज कित्येक वर्षांनी पांढºया कोटवाल्यांकडे आणि खाकी वर्दीकडे पाहून आपण नतमस्तक होतोय. प्रार्थना मंदिरांऐवजी आरोग्यमंदिरांची निकड कधी नव्हे इतकी वाटू लागली आहे़ डॉक्टर्स, शासन सगळे फक्त खबरदारी घ्या, काळजी घ्या असं सांगत आहेत. आपण काय करतो आहोत? पोलीस अधिकारी मुलाखतीतून पुन्हा पुन्हा सांगत आहेत, ‘लोक असं का करत आहेत, गांभीर्य का समजून घेत नाहीत याचीच चिंंता वाटते.’ शेवटी असं वाटायला लागलंय कोरोना तुम्हाला मारायला येत नाहीय, तुम्हीच मृत्यूच्या उंबरठ्यावर जाऊन उभं राहताय.
मग काय करायचं घरात बसून! आम्हाला कामाची सवय आहे, मी कधी घरात रिकामा बसत नसतो हा वृथा अभिमान मात्र उफाळून येतोय. त्यापेक्षा आता घरात राहून स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी करता येऊच शकतात.
प्रसारमाध्यमेही हे सर्व उपाय सुचविण्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेतच. मात्र कोरोना ही इष्टापत्ती समजून विकासाच्या संधी कशा उपलब्ध होतील याचा भविष्यकालीन विचार आवश्यक आहे. तरच तो 'स्व' चा लोप करीत समाजाचा आणि आजघडीला विश्वाचा व्यापक विचार ठरेल. प्रकाशाच्या झगमगाटात आपली तारे पाहण्याची क्षमता कमी झालीय. घरात राहण्याची सक्ती असल्यामुळे स्वत:पासून आणि जगापासून दूर गेल्याची भावना येतेय. मोबाईल, टी. व्ही., कॉम्प्युटरपासून थोडं जरी अलिप्त राहिलं तरी असुरक्षित वाटू लागतं. माझा मौल्यवान वेळ जातोय असंही वाटू लागतं. केवळ पैसा कमावण्यासाठी वेळ देणं म्हणजेच मौल्यवान वेळ ही समजूत होतेय. घरात बसा आणि विवेकी विचार करा!- प्रा. डॉ. नभा काकडे,(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)