सचिन कांबळे
पंढरपूर : श्री यंत्राच्या आकारामध्ये साकारण्यात आलेले तुळशीवृंदावन पर्यटनाचे केंद्र बनले आहे. मात्र तुळशीवृंदावनाच्या देखभालीसाठी येणाºया लाखो रुपयांच्या खर्चाचा बोजा वनविभागावर पडत आहे. त्यामुळे आता प्रवेश शुल्क म्हणून प्रौढासाठी ५ तर बालकांसाठी ३ रुपये दर आकारण्याचे विचाराधिन असल्याचे वनविभागाच्या वतीने कळविण्यात आले.
या तुळशीवृंदावनात श्री विठ्ठलाची २५ फूट उंचीची मूर्ती, विविध संतांच्या मूर्ती असलेल्या ८ संतकुटी तयार करण्यात आल्या आहेत. वारकरी संप्रदायातील २३ संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक भित्तीचित्रे साकरण्यात आली आहेत. विविध आठ प्रकारच्या तुळशी व विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांची झाडे लावण्यात आली आहेत.
यामुळे पंढरपुरातील हे तुळशीवृंदावन राज्यात पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक तुळशीवृंदावनास भेट देतात. त्याचबरोबर शहरातील नागरिक देखील रोज या ठिंकाणी येतात. यामुळे रोज हजारोंची गर्दी त्याठिकाणी जमते. त्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उद्यानामध्ये ३० ते ३२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. तुळशीवृंदावनाच्या देखभालीसाठी १२ कमांडो, २ माळी, १ स्विपर, २ स्वच्छता कामगार, १ इलेक्ट्रिशियन असे कामगार कार्यरत आहेत़ शिवाय तुळशीवनाचे महिन्याचे विजेचे बिल अंदाजे ४० हजार रुपयांच्या आसपास येते. त्याचबरोबर कर्मचाºयांचा पगार असा लाखो रुपयांचा बोजा वनविभागावर पडत आहे. यामुळे वनविभागाकडून तुळशीवृंदावन पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांकडून नाममात्र फी घेण्यात येणार आहे.
पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट- श्री विठ्ठलाची २५ फूट उंच मूर्ती तुळशीवनात आहे़ रंगीबेरंगी विद्युत रोषणाईतील कारंजेदेखील तुळशीवनाचे आकर्षण ठरत आहेत. त्याठिकाणी गेलेला प्रत्येक जण श्री विठ्ठलाची मूर्ती व कारंजासमोर सेल्फी काढताना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी हे सेल्फी पॉइंट ठरत असल्याचे दिसून येते.
पिण्याच्या पाण्याची सोय करा
- - तुळशीवृंदावन पाहण्यासाठी रोज हजारो नागरिक व भाविक त्याठिकाणी येतात. मात्र त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी काँग्रेस युवकचे संजय घोडके यांनी केली.
नाममात्र प्रवेश शुल्क
- - तुळशीवृंदावन पाहण्यासाठी येणाºया १५ वर्षांपुढील व्यक्तींना ५ रुपये तर १५ वर्षांखाली व्यक्तींना ३ रुपये असे नाममात्र फी आकारण्यात येणार आहे. तुळशीवृंदावन सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत व. सायंकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतच्या वेळेत सुरु राहणार असल्याचे उपवनसंरक्षक विलास पोवळे यांनी सांगितले.
भाव-भक्तिगीतांची धून
- - तुळशीवनात सुंदर कारंजे साकारण्यात आलेले आहेत तसेच याठिकाणी उत्कृष्ट साऊंड सिस्टीमदेखील बसवण्यात आली आहे. यामुळे तुळशीवन परिसरात विठोबाची व संतांची गीते ऐकण्यास मिळत आहेत. भाव व भक्तिगीतांमुळे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक नागरिकाचे व भाविकाचे मन प्रफुल्लित होत असल्याचे अॅड. अखिलेश वेळापूर यांनी सांगितले.