पंढरपूरला येणारा भाविक हा खूप सोशिक आहे. पाणी, आरोग्य, शौचालय आणि वाहतुकीच्या सुविधा याच त्यांच्या अपेक्षा असतात. या सर्व गोष्टी त्याला वेळेवर मिळायला हव्यात. भपकेबाज सुविधांची त्याला अपेक्षाही नाही. १९९९-२००२ या कालावधीत मी पंढरपूरचा प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होतो. नवखा माणूस म्हणून माझ्यावरही दडपण होतेच. जिल्हाधिकारी हे मंदिर समितीचे प्रशासक असल्याने मंदिर समितीचे कामही माझ्याकडे होते.
पहिल्याच वर्षी मला काही गोष्टी लक्षात आल्या. वाखरी ते पंढरपूर हा रस्ता एकपदरीच होता. दशमीला सकाळी जवळपास सर्वच पालख्या वाखरीला एकत्र येतात आणि दुपारनंतर वारकºयांचे जत्थे पंढरपुरात येऊ लागतात. वाखरी ते पंढरपूर या एकपदरी रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत गर्दीच गर्दी असायची. पालख्यांसोबत आलेल्या वाहनांना पंढरपुरात येण्यास वेळ लागायचा.
वारकºयांचे साहित्य शहराबाहेरच राहिले, त्यांना वेळेवर जेवणच मिळाले नाही, अशा अनेक तक्रारी पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांकडून ऐकायला मिळायच्या. आषाढी वारीनंतर काही दिवसांत आम्ही वाखरी ते पंढरपूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तयार केला. तो तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे सादर केला आणि विशेष म्हणजे पुढील वर्षापर्यंत चौपदरी रस्ता तयारही झाला. आमच्या काळात झालेले हे महत्त्वपूर्ण काम म्हणावे लागेल.
यानंतर २००३-२००६ या काळात फलटणचा प्रांताधिकारी म्हणून रुजू झालो. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी याच मार्गावरून येते. पंढरपूरच्या तुलनेत तिथे फारसे काम करावे लागले नाही. पण पालखी प्रमुखांशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, स्वच्छता आदी कामे करून घेतली. यंदाच्या वर्षी मी वारीचा प्रशासकीय जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहतोय. १८ वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज पंढरपुरात अनेक चांगल्या गोष्टी झाल्या आहेत.
प्रशासनाकडे त्यावेळी फारसे कर्मचारी नसायचे. मोजक्या कर्मचाºयांकडून काम करून घ्यावे लागायचे. आज रस्त्यांची कामे झालीत. मोठा पूल झाला. शौचालयांची संख्या वाढलेली आहे. ६५ एकर परिसर विकसित झाला आहे. वारी काळात बसस्थानके शहराच्या बाहेर हलविण्यात आली आहेत. सुविधा नव्हत्या तेव्हाही पंढरपूर शहर एकाच दिवशी १० लाख भाविकांना सामावून घ्यायचे. आजही तोच उत्साह आहे. प्रशासनातील मंडळीही मोठ्या उत्साहाने काम करीत आहेत. ही त्यांची एकप्रकारची वारकरी सेवाच आहे. शब्दांकन : राकेश कदम